Rural Business Idea:- व्यवसाय करायची प्रत्येकाची इच्छा असते. परंतु व्यवसाय सुरू करण्याआधी लागणारे भांडवल आणि त्या व्यवसायाला असलेली बाजारपेठेतील किंवा व्यवसाय ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी असलेली मागणी या दृष्टिकोनातून विचार करणे खूप गरजेचे असते.
जर साधारणपणे आपण व्यवसायांचे स्वरूप किंवा वर्गीकरण पाहिले तर काही व्यवसाय हे फक्त शहरांमध्ये चांगल्या प्रकारे जम बसवू शकतात व चांगला नफा देऊ शकतात. तसेच काही व्यवसाय हे शहरात अजिबात चालणारे नसतात व ग्रामीण भागामध्ये ते मोठ्या प्रमाणावर नफा मिळवून देऊ शकतात.
त्यामुळे तुम्ही ग्रामीण भागात राहत आहात की शहरी भागात या दृष्टिकोनातून व्यवसायाची निवड खूप महत्त्वाची ठरते. आता ग्रामीण भाग म्हणजेच गावांचा विचार केला तर प्रामुख्याने शेतीप्रधान संस्कृती असल्यामुळे व मोठ्या प्रमाणात लोकसंख्या ही शेती सारखे व्यवसायांमध्ये गुंतलेली असते.
त्यामुळे त्या ठिकाणी असलेल्या लोकांच्या गरजा या नक्की शहरी भागातील लोकांच्या गरजांपेक्षा बहुतांशी वेगळ्या असतात. त्यामुळे त्याच पद्धतीने तुम्हाला ग्रामीण भागात व्यवसाय उभारण्यासाठी आखणी करणे गरजेचे असते. याच मुद्द्याला धरून जर तुम्हाला तुमच्या गावांमध्ये व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असेल तर तुम्ही या लेखात दिलेल्या व्यवसायांपैकी एक व्यवसायाची निवड करून तुम्ही चांगला पैसा मिळवू शकतात.
गावात राहतात तर हे व्यवसाय सुरू करा आणि कमवा लाखोत
1- डेअरी सेंटर– जर तुम्ही गावामध्ये राहत असाल तर तुम्ही डेअरी सेंटर सुरू करून चांगला पैसा मिळवू शकता. गावामध्ये प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी गाई किंवा म्हशी मोठ्या प्रमाणावर पाळल्या जातात. अशा गावांमध्ये डेअरी सेंटरच्या माध्यमातून दुधाचे संकलन करून ते संकलित झालेले दूध दुसरीकडे पाठवले जाते व असे दूध हे शहरी भागामध्ये मोठ्या प्रमाणावर वितरित होते. त्यामुळे या व्यवसायातून तुम्ही हमखास चांगला पैसा मिळवू शकतात.
2- रासायनिक खते व कीटकनाशकांचे दुकान म्हणजेच कृषी सेवा केंद्र– ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर शेती हा प्रमुख व्यवसाय असल्यामुळे पिकांच्या भरघोस उत्पादनाकरिता कीटकनाशक व खतांची आवश्यकता असते हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे तुमच्या गावातील किंवा परिसरातील पिकांची लागवड व त्या लागवडीचे प्रमाण इत्यादी डोळ्यासमोर ठेवून तुम्ही रासायनिक खते व कीटकनाशक विक्रीचे दुकान सुरू करू शकतात. हा व्यवसाय तुम्हाला लाखोत पैसा मिळवून देऊ शकतो.
3- कपड्यांचे दुकान– कपड्यांचे दुकान हे शहरी भागासारखेच ग्रामीण भागात देखील मोठ्या प्रमाणावर नफा देऊ शकते. तसेच ग्रामीण भागामध्ये जास्त प्रमाणात कपड्यांचे दुकाने उपलब्ध नसतात. त्यामुळे तुम्ही वेगवेगळ्या व्हरायट्यांचे कपडे ठेवून जर कपड्यांचे दुकान सुरू केले तर नक्कीच या माध्यमातून तुम्ही चांगला पैसा मिळवू शकतात.
4- किराणा दुकान– गावामध्ये किराणा दुकान उघडले तर खूप फायद्याचे ठरू शकते. गावाची लोकसंख्या जर थोडी जास्त असेल तर या गावाशी निगडित असलेले बरेच आजूबाजूचे लोक देखील किराणा बाजार किंवा इतर बाबींच्या खरेदीसाठी मोठ्या गावात येत असतात. त्यामुळे तुम्ही किराणा दुकानाचा व्यवसाय सुरू करून चांगला नफा मिळवू शकतात. तुमच्या किराणा दुकानांमध्ये वाजवी दर आणि कॉलिटी चांगली असेल तर गावामध्ये एकापेक्षा जास्त किराणा दुकान असले तरी देखील तुमचा व्यवसाय चांगला चालू शकतो.
5- फ्लोअर मिल म्हणजेच पिठाची गिरणी– ग्रामीण भागामध्ये प्रामुख्याने शहरी भागासारखे पॅकेज असलेले पीठ वापरत नाहीत. कारण ग्रामीण भागामध्ये शेतकरी कुटुंब असल्यामुळे शेतकऱ्यांच्या घरी असलेली बाजरी, गहू किंवा ज्वारी गिरणीवर दळले जाते. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये पिठाची गिरणी सुरू करणे हे देखील पैसा मिळवण्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहे. पिठाची गिरणीचा व्यवसाय तुम्ही एक साईड बिझनेस म्हणून करू शकतात व जास्तीचा इन्कम मिळवू शकतात.
अशा पद्धतीने या व्यतिरिक्त देखील तुम्ही बरेच व्यवसाय गावात करू शकता आणि चांगला नफा मिळवू शकता.