Dollar Rate : परकीय चालनाबाबत रिझर्व्ह बँकेकडून शुक्रवारी महत्वाची बातमी समोर आली आहे. रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार, देशाचा परकीय चलन साठा 1 मार्चच्या आठवड्यात $6.55 अब्जने वाढून $625.63 अब्ज झाला आहे.
सध्या भारतीय शेअर बाजारात तेजी दिसून येत आहे. सेन्सेक्स दररोज नवीन उच्चांक गाठत आहे. विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात मोठी गुंतवणूक करण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे 1 मार्चच्या आठवड्यात भारताच्या परकीय चलनाच्या साठ्यात लक्षणीय वाढ पाहायला मिळाली आहे.
याच्या एका आठवड्यापूर्वी, एकूण परकीय चलन साठा $2.97 अब्जने वाढून $619.07 अब्ज झाला होता. ऑक्टोबर 2021 मध्ये, देशाच्या परकीय चलनाचा साठा $645 अब्ज डॉलरच्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचला होता.
गेल्या वर्षीपासून जागतिक घडामोडींमुळे निर्माण झालेल्या दबावादरम्यान, मध्यवर्ती बँकेने रुपयाची घसरण रोखण्यासाठी भांडवली राखीव निधीचा वापर केला, ज्याचा चलन साठ्यावर परिणाम झाला आहे.
रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार, 1 मार्च रोजी संपलेल्या आठवड्यात, चलन साठ्याचा महत्त्वाचा भाग मानल्या जाणाऱ्या परकीय चलन संपत्ती $ 6.04 अब्जने वाढून $554.23 अब्ज झाली आहे. डॉलरच्या संदर्भात व्यक्त केलेल्या, परकीय चलन मालमत्तेमध्ये यूरो, पौंड आणि येन यांसारख्या गैर-यूएस चलनांमधील चढ-उतारांचा प्रभाव समाविष्ट असतो.
रिझर्व्ह बँकेने सांगितले की, ‘या आठवड्यात सोन्याच्या साठ्याचे मूल्य $ 569 कोटींनी वाढून $ 48.42 अब्ज झाले आहे. रिझर्व्ह बँकेने सांगितले की स्पेशल ड्रॉइंग राइट्स (SDR) $170 दशलक्षने घसरून $18.18 अब्ज झाले.’
रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार, ‘आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे असलेल्या भारताच्या राखीव ठेवीही समीक्षाधीन आठवड्यात $410 दशलक्षने घसरून $4.79 अब्जवर आल्या आहेत.’