तुमच्या घरी बाईक असेल किंवा कार असेल तर तुमचा संबंध हा पेट्रोल पंपाशी कायम येत असतो. कारण तुम्हाला कार किंवा बाईकमध्ये पेट्रोल किंवा डिझेल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर जावेच लागते. आजकाल जर आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किमती पाहिल्या तर या गगनाला पोहोचले असल्यामुळे पेट्रोल पंपावर इंधन म्हणजेच पेट्रोल किंवा डिझेल भरताना काळजी घेणे देखील तितकेच गरजेचे आहे.
साधारणपणे आपण जेव्हा पेट्रोल पंपावर पेट्रोल किंवा डिझेल भरण्यासाठी जातो व आपण पेट्रोल मीटरची रीडिंग शून्य आहे का हे प्रामुख्याने पाहतो व ते तितके गरजेचे आहे. परंतु पेट्रोल पंपावर फसवणुकीच्या काही पद्धती देखील अवलंबल्या जाऊ शकतात व त्या दृष्टिकोनातून देखील आपण सावध राहणे महत्त्वाचे असते.
त्यामुळे तुम्ही देखील जर पेट्रोल पंपावर पेट्रोल किंवा डिझेल भरायला जात असाल तर तुमची फसवणूक होऊ नये याकरिता तुम्ही काही सोप्या परंतु महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष देणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे या लेखात आपण या संबंधीची महत्त्वाची माहिती बघू.
पेट्रोल किंवा डिझेल भरताना पेट्रोल पंपावर ही काळजी घ्या
1- ठराविक एका किमतीचे पेट्रोल भरणे टाळा– पेट्रोल पंप चालकाकडे किंवा तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे पेट्रोल-डिझेल चोरण्याच्या अनेक प्रकारच्या युक्त्या असतात. त्यापैकी एक म्हणजे काही विशिष्ट किमतीसाठी आधीच कमी प्रमाणात पेट्रोलची पातळी सेट करून ठेवलेली असते.
म्हणजेच बरेच जण 200 व पाचशे रुपयांचे पेट्रोल भरतात. त्यामुळे पेट्रोल पंपावर जे कर्मचारी काम करतात ते कधी कधी अशा काही ठराविक अशा आकड्यांवर पेट्रोलची कमी पातळी म्हणजेच व्हॉल्युम सेट करून ठेवतात. त्यामुळे तुम्हाला हे प्रमाण सेट केले असल्यामुळे कमी पेट्रोल किंवा डिझेल मिळते. त्यामुळे ठराविक एका रकमेचे पेट्रोल किंवा डिझेल न भरता ते 545 किंवा 235 किंवा 155 किंवा 150 अशा किमतीच्या स्वरूपामध्ये पेट्रोल भरावे.
2- पेट्रोल भरण्याअगोदर शून्य रीडिंग पाहणे– पेट्रोल भरायला जाताना जेव्हा तुम्ही पेट्रोल भराल तेव्हा त्या अगोदर पेट्रोल पंपावरील मीटरवर कायम शून्य हा आकडा आहे का नाही हे तपासून बघावे.
त्यामुळे एखाद्यावेळी जर मीटरवरील आकडा शून्य पेक्षा जास्त असेल तर त्यापुढे तुम्ही जे काही पेट्रोल किंवा डिझेल भराल त्याचे प्रमाण हे कमी भरले जाईल व यामध्ये तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते. त्यामुळे अगोदर शून्य रीडिंग आहे की नाही ते पाहणे गरजेचे आहे.
3- पॉवर पेट्रोल हा वेगळा प्रकार– बऱ्याचदा आपण गाडीमध्ये ठरावीक किमतीचे पेट्रोल भरण्यास सांगतो. यामध्ये तुमचे सर्व लक्ष असते. परंतु तरी देखील गाडीमध्ये कमी प्रमाणात पेट्रोल भरले जाते. जेव्हा तुम्ही या संबंधी विचारतात तेव्हा गाडीमध्ये जे काही पेट्रोल भरलेले आहे ते पावर पेट्रोल आहे असे सांगितले जाते.
कारण पेट्रोल पंपांवर साधे आणि पावर अशा दोन प्रकारचे पेट्रोल मिळत असते. त्यामुळे तुम्ही भरत असलेले पेट्रोल कोणत्या प्रकारचे आहे? हे तुम्ही विचारून घेणे खूप गरजेचे आहे. कारण पावर पेट्रोलची किंमत साध्या पेट्रोल पेक्षा जास्त असते. परंतु त्याचा काही विशेष गाडीसाठी उपयोग होतो असे देखील नसते.
4- क्वांटिटी तपासून घेणे गरजेचे– समजा तुम्हाला पेट्रोल भरताना तुमची फसवणूक झाली आहे किंवा फसवणूक केली जात आहे असे जर मनात आले तर तुम्ही त्या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांना त्या पेट्रोलचे परिणाम म्हणजेच क्वांटिटी तपासून दाखवायला सांगू शकतात. जर यामध्ये काही गडबड असेल तर ती लगेच तुमच्या लक्षात येऊ शकते व तुमची फसवणूक टळू शकते.