Cibil Score :- कुठलीही बँक किंवा खाजगी वित्तीय संस्था यांच्याकडून जर तुम्हाला कुठल्याही कामाकरिता कर्ज घ्यायचे असेल तर त्याकरिता सगळ्यात महत्त्वाचा आणि आवश्यक मुद्दा म्हणजे तुमचा असलेला सिबिल स्कोर हा होय. तुमचा सिबिल स्कोर जर चांगला असेल तर तुम्हाला कुठल्याही बँकेतून कर्ज मिळण्यात कुठल्याही प्रकारचे अडचण उद्भवत नाही व तुम्हाला ताबडतोब कर्ज मंजूर होते. सिबिल स्कोर अर्थात क्रेडिट स्कोर हा साधारणपणे अंकात मोजला जातो.
तीनशे ते नऊशे या अंकांच्या दरम्यान याचे मापन केले जाते. यामध्ये व्यक्तींचा सिबिल हा सातशेपेक्षा कमी असेल तर अशांना कर्ज मिळण्याची शक्यता जवळजवळ नसते. कर्ज मिळते परंतु मग त्यासाठी गॅरेंटर देणे किंवा तारण इत्यादी बाबींचा अवलंब करावा लागतो. दुसरी बाब म्हणजे कमी सिबिल असल्यावर कर्ज मिळते परंतु त्यासाठी जास्तीचा व्याजदर देखील आकारला जाऊ शकतो.
यामध्ये आपण विचार केला तर तीनशे ते साडेपाचशे दरम्यानचा सिबिल स्कोर हा चांगला मानला जात नाही व साडेपाचशे ते साडेसातच्या दरम्यान चा स्कोर हा ठीकठाक अर्थात फेअर या कॅटेगरी देतो. परंतु त्या पुढचा सिबिल स्कोर हा उत्तम समजला जातो. जर तुमचाही सिबिल स्कोर घसरलेला असेल तर तो वाढवण्याकरिता तुम्हाला काही गोष्टींची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. त्या अनुषंगाने आपण या लेखात महत्त्वाच्या बाबी पाहू ज्या तुम्हाला तुमचा घसरलेला सिबिल वाढवण्यास मदत करतील.
सिबिल वाढवण्यासाठी हे करा
1- तुमची प्रोफाइलची तपासणी नियमितपणे करणे– तुमच्या क्रेडिट प्रोफाइलचे तपासणी आणि देखरेख करण्याची सवय लावून घेणे खूप गरजेचे आहे. तसेच यामध्ये तुम्ही कर्ज घेतलेले असेल व तुम्ही रिपेमेंट व्यवस्थित करत असाल तर त्याचे रेकॉर्ड तपासणे देखील गरजेचे आहे. तुम्ही जरी नियमितपणे हप्ते भरत आहात परंतु काही किरकोळ चुका झाल्या तरी सिबिलवर याचा वाईट परिणाम होऊ शकतो.
दुसरे महत्त्वाचे म्हणजे इतर व्यक्तींच्या चुकीच्या व्यवहारामुळे देखील आपल्या सिबिलवर परिणाम पडू शकतो. या मुद्द्याचे उदाहरणच घ्यायचे झाले तर आपण बऱ्याचदा एखाद्या व्यक्तीला कर्जासाठी सह कर्जदार असतो किंवा जामीनदार तरी असतो. जर संबंधित व्यक्तीने कर्ज फेडण्यामध्ये अनियमितता दर्शवली तर त्याचा विपरीत परिणाम हा जामीनदार किंवा सह कर्जदार या नात्याने तुमच्या सिबिल वर देखील होण्याची दाट शक्यता असते. तसेच क्रेडिट प्रोफाईलमध्ये तुमचे नाव तसेच जन्मतारीख, तुमचा पत्ता तसेच पॅन कार्ड नंबर इत्यादी अचूक आहेत की नाही याची तपासणी करणे देखील गरजेचे आहे.
2- महत्वाच्या ठिकाणी योग्य पावले किंवा निर्णय घेणे– जर तुमच्या क्रेडिट स्कोर अर्थात सिबिल मध्ये काही विसंगती दिसून येत असतील तर त्यामध्ये दुरुस्ती करणे गरजेचे आहे. त्याकरता तुम्ही क्रेडिट ब्युरो आणि बँकांशी संपर्क साधून तुमच्या शंकांचे निरसन करून घेऊ शकतात व झालेल्या चुकांमध्ये दुरुस्ती करून घेणे गरजेचे आहे.
समजा तुमच्या क्रेडिट रिपोर्ट मध्ये जर एखादा कर्जाचे पेमेंट थकलेले किंवा चुकलेले दिसत असेल तर लवकरात लवकर पेमेंट करण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. कारण तुमचे पेमेंट हिस्टरीचा क्रेडिट स्कोर मध्ये 30 ते 40% इतके महत्वाचे स्थान असते. एखाद्या कर्ज थकबाकी 90 दिवसांपेक्षा जास्त असेल तर अशा प्रकारची कर्ज खाते हे राईट ऑफ अर्थात खराब श्रेणीमध्ये टाकले जातात.
त्यामुळे संबंधित थकबाकी असलेले कर्ज तुम्ही भरल्यानंतर तुमचे सिबिल प्रोफाइल मधून राईट ऑफ हा रीमार्क निघाला आहे की नाही हे तपासून घेणे गरजेचे आहे. बऱ्याचदा काही व्यक्तींकडून पूर्ण कर्ज भरले जात नाही त्यामुळे बँकेकडून ओटीएस अर्थात तडजोड करण्यासाठी काही ऑफर दिल्या जातात. त्यालाच आपण सेटलमेंट असे देखील म्हणतो. तुम्ही जर सेटलमेंट करून कर्ज भरले असेल तर याचा देखील वाईट परिणाम तुमच्या सिबिल स्कोर वर होतो. कर्जाचे संपूर्ण पैसे भरणे गरजेचे आहे.
3- सिबिल स्कोर चांगला ठेवण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी– कर्जाची थकबाकी पूर्णपणे भरण्याचा प्रयत्न करा आणि येणाऱ्या भविष्यकाळात देखील तुमच्याकडे थकबाकी राहणार नाही याची पुरेपूर काळजी घ्या. तुम्ही क्रेडिट कार्डचा वापर करत असाल तर त्या क्रेडिट कार्डवर तुम्हाला जी काही खर्चाची मर्यादा असेल त्यापेक्षा जास्तीची खरेदी आणि व्यवहार करणे चुकीचे आहे. याचादेखील तुमच्या क्रेडिट स्कोरवर नकारात्मक परिणाम होतो.
याकरिता तुमच्या क्रेडिट कार्डचे जी काही मर्यादा असेल त्याच्या 40 टक्क्यांपर्यंतच व्यवहार करावा. तसेच बरेच जणांना कर्ज मिळवण्यासाठी अनेक ठिकाणी अर्ज करण्याची सवय असते. अशा अनेक ठिकाणी कर्जाकरिता अर्ज केल्याने देखील तुमच्या क्रेडिट प्रोफाईलवर वाईट परिणाम होऊ शकतो.
तुम्ही जर परत परत किंवा अनेक ठिकाणी कर्जासाठी अर्ज करत असाल तर तुम्हाला कर्जाची खूप गरज आहे असा अर्थ त्यातून होतो. कर्ज घेताना ते सुरक्षित किंवा असुरक्षित यामध्ये विचार करणे खूप गरजेचे आहे. कर्ज जर असुरक्षित असेल तर त्याचा क्रेडिट स्कोरवर खूप मोठा परिणाम होतो त्यामुळे सुरक्षित व असुरक्षित कर्ज यामध्ये बॅलन्स साधने खूप गरजेचे आहे.
अशा पद्धतीने तुम्ही काही गोष्टींची काळजी घेतली तर तुमचा घसरलेला क्रेडिट स्कोर सुधारू शकतो किंवा तुमच्या क्रेडिट स्कोरची तुम्ही काळजी घेऊ शकतात.