आर्थिक

Mushroom Farming: ‘या’ तरुणाने एमबीए पूर्ण केले व नोकरी न करता सुरू केली मशरूम शेती! वर्षाला आहे 50 ते 70 लाखापर्यंत कमाई

Mushroom Farming:- उच्च शिक्षण पूर्ण करून चांगल्या पगाराची नोकरी मिळाल्यानंतर अनेक तरुण त्यामध्ये समाधानी राहतात व संपूर्ण आयुष्यभर एक चाकोरीबद्ध जीवन जगताना आपल्याला दिसून येतात. परंतु काही तरुण असे असतात की ते चाकोरीच्या बाहेर जीवन जगतात व अशा जीवनात ते खूप मोठ्या प्रमाणावर यशस्वी होतात.

उच्चशिक्षण घेऊन नोकरी न करता किंवा असलेली हातातील चांगले पॅकेजची नोकरी सोडून एखादा व्यवसाय उभारतात व मेहनतीने व्यवसाय विकसित करतात व लाखो रुपयांची कमाई त्या माध्यमातून करतात. अशी अनेक उदाहरणे आपण  पाहिलेली किंवा त्याबद्दल वाचलेले तरी असेल.

अगदी याच पद्धतीची जर आपण प्रेरणादायी कथा बघितली तर ती काश्मीरचा रहिवासी असलेला अरुण शर्मा याची सांगता येईल. अरुण देखील उच्च शिक्षित असून त्याने एमबीए पूर्ण केलेले आहे. परंतु त्यांनी एमबीए पूर्ण करून घरी येऊन मशरूम लागवडीला सुरुवात केली व याच मशरूम लागवडीतून तो आज वर्षाला लाखोत उत्पन्न घेत आहे.

 अरुण शर्माची प्रेरणादायी कहाणी

अरुण शर्मा हा जम्मू-काश्मीर राज्यातील कठुआचा रहिवाशी असून त्याने एमबीए पूर्ण केले व एमबीए पूर्ण करून त्याने कुटुंबासोबतच राहायचे ठरवले. जेव्हा तो कुटुंबासोबत होता तेव्हा एका एनजीओमध्ये तो सामील झाला व तो ज्या एनजीओमध्ये सामील झाला ते एनजीओ महिलांसाठी काम करत होते.

या एनजीओच्या माध्यमातून महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हाव्यात याकरिता  सरकारच्या माध्यमातून कठुवा मध्ये बटन मशरूम लागवडीवर प्रशिक्षण कार्यक्रम राबवला जात होता. या ठिकाणाहूनच अरुण शर्मा यांच्या मनामध्ये मशरूम लागवडीची कल्पना आली.

अशी केली मशरूम लागवडीला सुरुवात

मशरूम लागवड करायचे निश्चित केल्यानंतर अरुण याने त्याच्या घरातील एका छोट्या खोलीतून मशरूमची लागवड करायला सुरुवात केली. आज एका छोट्या खोलीतून सुरू झालेला मशरूम लागवडीचा प्रवास वर्षाला 35 टन मशरूमच्या उत्पादनापर्यंत पोहोचला आहे. इतकेच नाही तर शेतकऱ्यांना 45 लाख रुपयांपर्यंतचे मशरूम खताची विक्री देखील अरुण सध्या करतो.

मशरूम विक्री आणि मशरूम खताच्या विक्रीतून तो वर्षाला तब्बल 90 लाख रुपयांचा व्यवसाय करत आहे. परंतु मशरूमच्या बिया खरेदी करणे तसेच अंधाऱ्या खोलीत त्यांची लागवड करणे त्याची विक्री कोणत्या ठिकाणी केली जाऊ शकते याबद्दल अगोदर अरुणने पूर्ण माहिती मिळवली.

त्यानंतर अनुभव यावा याकरिता स्थानिक पुरवठादाराकडून 100 तयार मशरूम पिशव्या खरेदी केल्या व ही पिशवी प्रति बॅग 90 रुपये प्रमाणे मिळाली व एकूण नऊ हजार रुपये त्यासाठी त्याला लागले. दोन महिन्यांनी मशरूमचे चांगले उत्पादन मिळाले व सुरुवातीला एकूण  सोळा हजाराचे पहिले उत्पन्न त्याला या माध्यमातून मिळाले.

नंतर मशरूम पिशव्यांची संख्या त्यांनी वाढवायला सुरुवात केली व त्यासोबतच एनजीओमध्ये काम करणे देखील सुरूच ठेवले. साधारणपणे 2014 मध्ये  अरुणला कळले की बाजारात मशरूमची मागणी वाढत आहे आणि त्यामुळे आपण मशरूमचे उत्पादन वाढवणे गरजेचे आहे.

त्यानंतर त्याने त्या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू केले व घरा जवळील जुन्या इमारतीत मशरूमची लागवड करायला सुरुवात केली. 2015 मध्ये त्यांनी बँकेकडून सात लाखांचे कर्ज घेतले व स्वतःच्या बचतीतून तीन लाख रुपये असे दहा लाखांची गुंतवणूक करून मशरूम लागवडीसाठी सेटअप तयार केला.

त्यामुळे अरुण शर्मा यांना कोणत्याही हंगामात मशरूमची लागवड करणे शक्य झाले. अरुणने त्याच्या घराच्या 1000 स्क्वेअर फुट जागेमध्ये युनिट उभारले आणि प्रत्येकी दीड टणांचे दोन एसी बसवले. या पद्धतीने मशरूमचे उत्पादन वाढवले व विक्री देखील वाढत गेली व त्यामुळेच त्यांनी 2017 मध्ये पुन्हा व्यवसाय वाढवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले.

 मशरूम खताच्या विक्रीतून होते लाखोत कमाई

मशरूम लागवड केल्यानंतर मशरूम विक्री पर्यंतच नाही तर 2019 मध्ये अरुण शर्मा यांनी मशरूम कंपोस्ट तयार करायला सुरुवात केली. त्यासाठी पाच हजार चौरस फुटांपेक्षा जास्त जागा तयार केली व तेथून वर्षाला जवळपास 50 हजार कोटी खताचे उत्पादन तो घेतो.

हे मशरूम कंपोस्ट खत 90 रुपये किलोने विकले जात असल्याचे देखील अरुण शर्मा यांनी सांगितले. या मशरूम कंपोस्ट खत विक्रीतून वर्षाला 45 लाख रुपयांचे उत्पन्न त्याला मिळते.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts