Union Bank of India : भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) रेपो दरात कोणताही बदल न करण्याच्या निर्णयानंतर आणखी एका सरकारी बँकेने ग्राहकांना आनंदाची बातमी दिली आहे. खरं तर, सार्वजनिक क्षेत्रातील बँक युनियन बँक ऑफ इंडियाने 700 आणि त्याहून अधिक क्रेडिट स्कोअर असलेल्या सर्व नवीन ग्राहकांसाठी कर्जावर सूट दिली आहे, बँकेने गृह कर्ज, वाहन कर्ज, दुचाकी कर्जासाठी प्रक्रिया शुल्कावर 100 टक्के सूट जाहीर केली आहे.
युनियन बँक ऑफ इंडिया प्रोसेसिंग फीमध्ये सूट देते
जर तुम्ही सध्या घर किंवा कार घेण्याचा विचार करत असाल तर ही संधी तुमच्यासाठी उत्तम ठरेल. कारण, युनियन बँक ऑफ इंडिया गृह आणि कार कर्जासाठी प्रक्रिया शुल्कावर 100% सूट देत आहे. म्हणजेच आता गृहकर्ज आणि वाहन कर्ज घेणाऱ्यांना प्रक्रिया शुल्क भरावे लागणार नाहीत. लक्षात घ्या ही ऑफर फक्त 16 ऑगस्ट 2023 ते 15 नोव्हेंबर 2023 पर्यंत असेल. त्यानंतर याचा लाभ मिळणार नाही. इतर बँका आणि वित्तीय संस्थांकडून गृहकर्ज हस्तांतरित करण्यासाठी प्रक्रिया शुल्कावर ही सूट मिळू शकते.
युनियन बँक ऑफ इंडिया एफडी दर
युनियन बँक ऑफ इंडिया 7 दिवस ते 10 वर्षांच्या FD वर सामान्य नागरिकांना 3 ते 7 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 3.50 ते 7.50 टक्के वार्षिक दराने व्याज ऑफर करते. बँकेच्या 5 ते 10 वर्षांच्या टॅक्स सेव्हिंग एफडीवर सर्वसामान्यांसाठी वार्षिक 6.70 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.20 टक्के व्याजदर दिला जात आहे.
बँक ऑफ महाराष्ट्रनेही सूट दिली आहे
बँक ऑफ महाराष्ट्र (BOM) ने शनिवारी गृह आणि कार कर्जावरील व्याजदरात 20 बेस पॉईंट्सपर्यंत कपात केली. बँकेने आपल्या ग्राहकांसाठी प्रक्रिया शुल्क देखील माफ केले आहे. बँकेच्या नवीन कपातीनंतर, नवीन गृहकर्ज दर 8.60 टक्क्यांवरून 8.50 टक्के दराने उपलब्ध असेल. तर, कार कर्ज 20 बेसिस पॉइंट्सने 8.70 टक्क्यांनी स्वस्त करण्यात आले आहे. बीओएमचे हे नवे दर 14 ऑगस्टपासून लागू झाले आहेत. बँकेच्या म्हणण्यानुसार, ग्राहकांना कमी व्याजदर आणि प्रक्रिया शुल्क माफीचा दुहेरी फायदा मिळेल. यामुळे ग्राहकांचा आर्थिक बोजा कमी होण्यास देखील मदत होणार आहे.