Women Success Story:- महिला म्हटले म्हणजे चूल आणि मूल ही संकल्पना आता कधीच मागे पडली असून प्रत्येक क्षेत्रामध्ये आता महिला पुरुषांच्या सोबत खांद्याला खांदा लावून आपल्याला काम करताना दिसून येत आहेत. यामध्ये संरक्षण क्षेत्र असो किंवा संशोधन क्षेत्र, विमानाच्या पायलट असो की आयएएस किंवा आयपीएस ऑफिसर या सर्व क्षेत्रात महिला आता पुढे आहेत.
या सर्व क्षेत्रांना आता कृषी क्षेत्र देखील अपवाद नसून कृषी क्षेत्र व त्या संबंधी असलेल्या जोडधंद्यांमध्ये देखील महिला यशस्वी उद्योजिका म्हणून पुढे आल्या असून पुरुषांच्या दोन पाऊल पुढे असल्याचे चित्र सध्या आपल्याला दिसून येत आहे. अगदी याच पद्धतीने जर आपण कर्नाटक राज्यातील राजेश्वरी या महिलेचा विचार केला तर यांनी देखील गाय पालन व्यवसाय सुरू केला
व या माध्यमातून त्यात लाखो रुपयांचा नफा मिळवत आहेत. या व्यवसायातून त्या प्रत्येक दिवसाला सहाशे लिटर पेक्षा जास्त दुधाची विक्री करतात. नेमके राजेश्वरी यांनी हे कसे साध्य करून दाखवले? याबद्दलची माहिती आपण या लेखात घेणार आहोत.
दूध व्यवसायातून महिन्याला मिळवतात सात लाखांचा नफा
कर्नाटक राज्यातील राजेश्वरी नावाच्या या महिला शेतकरी 43 वर्षाच्या असून त्यांचे गाव हे कर्नाटक राज्यातील तुमकुर जिल्ह्यात असलेले कोरटागिरी तालुक्यातील त्या रहिवासी आहेत. हा तालुका प्रामुख्याने दुष्काळग्रस्त तालुका म्हणून ओळखला जातो.
परंतु त्या ठिकाणी असलेल्या दुष्काळग्रस्त परिस्थितीवर मात करत राजेश्वरी यांनी डेअरी उद्योगांमध्ये खूप मोठे काम उभे केले आहे. जर त्यांच्या दूध व्यवसाय किंवा गाय पालन व्यवसायाचा विचार केला तर साधारणपणे पाच वर्षांपूर्वी अवघ्या पाच गायी खरेदी करून त्यांनी या व्यवसायाला सुरुवात केली.
परंतु जिद्द व चिकाटीने त्यांच्या या काऊ फार्मचे रूपांतर मोठ्या उद्योगांमध्ये झाले आहे. त्यांच्याकडे आज 46 गाई असून दररोज 650 लिटर दुधाचे उत्पादन त्यांच्या या फार्म मधून होते. डेरी क्षेत्रातील त्यांच्या या उल्लेखनीय कामाबद्दल इंडियन डेअरी असोसिएशन ने त्यांना मागच्या आठवड्यात बेंगलोर मधील बेस्ट वुमन डेअरी फार्मर पुरस्काराने देखील सन्मानित केले.
साधारणपणे या व्यवसायाला त्यांनी 2019 मध्ये सुरुवात केली होती. विशेष म्हणजे कोरटेगिरी हा दुष्काळग्रस्त भाग असून या ठिकाणी चारा व पाण्याची कायमच टंचाई असते व अशी परिस्थितीत देखील त्यांनी गाय पालन व्यवसाय सुरू करण्याचे धाडस केले.
गाईंना चाऱ्याची सोय व्हावी याकरिता मक्का आणि कापूस बियाणे पिकवण्याकरिता इतर शेतकऱ्यांकडून त्यांनी भाडेतत्त्वावर जमीन घेतली व गुरांना हिरवा चारा व धान्य उपलब्ध करून देण्याकरिता मका सारख्या पिकांची लागवड केली व त्याचा त्यांना खूप मोठा फायदा झाला.
यामध्ये त्यांनी प्रचंड प्रमाणात मेहनत घेतली व यामुळे त्यांना मिळणाऱ्या नफ्याचे प्रमाण हळूहळू वाढत गेले. जसा जसा नफा वाढू लागला तसं तसं त्यांनी शेड मधील गाईंची संख्या वाढवायला सुरुवात केली. ते प्रामुख्याने होलस्टीन फ्रिजियन आणि जर्सी गाईंचे संगोपन करतात.
आज त्यांच्याकडे 46 गाई असून राजेश्वरी या त्यांच्या डेरी फार्म मधून कर्नाटक मिल्क फेडरेशनला प्रत्येक दिवसाला 650 लिटर दुधाचा पुरवठा करतात व त्या माध्यमातून त्यांना प्रतिमाह सात लाख रुपयांचे उत्पन्न मिळते.
अशा पद्धतीने शून्यातून गाय पालनाला सुरुवात केली व आज राजेश्वरी यांनी अखंड मेहनत आणि चिकाटीने हा व्यवसाय लाखोत पोचवला.