PNB Dairy Scheme:- भारतातील शेतकरी शेतीला जोड व्यवसाय म्हणून मोठ्या प्रमाणावर पशुपालन व्यवसाय करतात. पशुपालन व्यवसायाच्या माध्यमातून दुधाचे उत्पादन हा शेतकऱ्यांचा प्रमुख आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत असतो. त्यामुळे दुधाचे उत्पादन वाढावे व पशुपालन व्यवसायाला प्रोत्साहन मिळावे याकरिता शासनाच्या माध्यमातून देखील अनेक प्रकारच्या योजना राबविण्यात येतात.
अशा योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अनुदान स्वरूपात मदत करण्यात येते. बँकांच्या माध्यमातून देखील वेगवेगळ्या प्रकारच्या कर्ज योजना असून त्या माध्यमातून देखील शेतकऱ्यांना आर्थिक मिळत असतो व शेतकऱ्यांना पशुपालन व्यवसाय करणे सोपे जाते.
याच मुद्द्याला धरून जर आपण पंजाब नॅशनल बँकेचा विचार केला तर या बँकेच्या पीएनबी विकास कार्ड योजनेचा फायदा घेऊन तुम्हाला देखील पालन व्यवसाय म्हणजेच डेरी व्यवसाय सुरू करता येईल. पंजाब नॅशनल बँकेच्या माध्यमातून याकरिता पीएनबी डेअरी विकास कार्ड योजना राबवली जात आहे. याच योजनेची माहिती या लेखात घेऊ.
काय आहे पंजाब नॅशनल बँकेची पीएनबी डेअरी विकास कार्ड योजना?
पंजाब नॅशनल बँक ही भारतातील शहरी आणि ग्रामीण भागामध्ये असून या बँकेच्या माध्यमातून पीएनबी डेरी विकास कार्ड योजना राबवली जात आहे व या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना घेता येऊ शकतो. या योजनेच्या माध्यमातून एक लाख रुपयांची संपूर्ण मदत दिली जाते.
जर तुम्हाला तुमच्या स्थानिक ठिकाणी राहून स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर ही योजना तुमच्यासाठी फायद्याची ठरू शकते. तसे पाहायला गेले तर ही एक बँकिंग योजना असून जी पशुसंवर्धन आणि दूध व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आलेली योजना आहे.
या योजनेच्या माध्यमातून पंजाब नॅशनल बँक एक लाख पर्यंत प्रोत्साहन रक्कम म्हणून कर्ज देते. या योजनेअंतर्गत 30 टक्के अनुदान देण्यात येते व 70 टक्के पैसे स्वतःला खर्च करावे लागतात.
काय आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठीची आवश्यक पात्रता?
पंजाब नॅशनल बँक डेअरी डेव्हलपमेंट स्कीमचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा भारताचा रहिवासी असणे गरजेचे असून अर्जदाराचे वय 18 वर्षे असणे आवश्यक आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे अर्जदार हा कोणत्याही प्रकारचा कर्जाचा थकबाकीदार नसावा.
बँकेतून मिळते एक लाख रुपयाचे कर्ज
पंजाब नॅशनल बँक त्यांच्या पीएनबी विकास कार्ड योजनेच्या माध्यमातून एक लाख रुपयांचे कर्ज सहाय्य देते. या कर्जावर तुम्हाला 30 टक्के सबसिडी मिळते. पंजाब नॅशनल बँकेच्या या योजनेचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या योजनेमध्ये घेतलेल्या कर्जावर तुम्हाला कुठल्याही प्रकारचे व्याज लागत नाही.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी कसा कराल अर्ज?
तुम्हाला देखील पंजाब नॅशनल बँकेच्या डेअरी डेव्हलपमेंट योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर अगोदर तुम्हाला तुमच्या जवळच्या पंजाब नॅशनल बँकेच्या अधिकृत बँक शाखेत जाणे गरजेचे आहे. या ठिकाणी तुम्हाला तुमच्या आधार तसेच पॅन कार्ड, मोबाईल नंबर आणि पासपोर्ट आकाराचा फोटो सोबत ठेवावा लागेल. या योजनेसाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने देखील अर्ज करू शकतात.
अधीकच्या माहितीसाठी तुम्ही तुमच्या जवळच्या पंजाब नॅशनल बँकेच्या शाखेशी संपर्क साधू शकतात.