आमदार नीलेश लंके हे सध्या प्रचंड चर्चेत आहेत. याचे कारणही असेच आहे. एक म्हणजे आगामी लोकसभेला खा. सुजय विखेंविरोधात ते लोकसभेला उभे राहणार असल्याच्या चर्चा आहेत, नुकतेच त्यांच्या प्रतिष्ठानतर्फे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची प्रमुख भूमिका असलेल्या शिवपुत्र संभाजी या महानाट्याचे सुरु असणारे प्रयोग जिल्ह्यात गाजले आहेत.
हे महानाट्य म्हणजे आ. निलेश लंके यांनी खा. सुजय विखे यांच्या विरोधकांची एकत्रित मोट बांधण्याची तयारी व आगामी लोकसभेची तयारी असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान या महानाट्याच्या निमित्ताने या स्टेजवर जे भाजपसह विविध पक्षातील मातब्बर नेते आ. निलेश लंके यांनी एकत्रित आणले होते त्याने आता आगामी काळातील राजकीय समीकरणे बदलतील का असे चित्र सध्या दिसत आहे.
या महानाट्याच्या निमित्ताने महायुतीतील भाजप, शिवसेना यांच्यासह महाविकास आघाडी व इतर पक्षाच्या १३ नेत्यांनी हजेरी लावत विरोधी गटाची अनोखी एकजूट दर्शवली. तसेच जाहीर व्यासपीठावरून आ. लंके यांचे कौतुक केल्याने दक्षिण मतदारसंघातील समीकरणे बदलतात की काय ? अशी चर्चाच सध्या सुरु आहे.
लोकसभा जसजशी जवळ येत आहे तसे जिल्ह्यात राजकीय पक्षांकडून धार्मिक, सामाजिक, प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्याची चढाओढ लागली, नीलेश लंके प्रतिष्ठाणतर्फे झालेल्या महानाट्याला जिल्हाभरातून प्रचंड प्रतिसाद मिळाला. चारही दिवस राजकीय दिग्गजांनी हजेरी लावून सर्वांचे लक्ष वेधले. एक प्रकार सर्व विरोधकांची ‘महायुती’ झाल्याचे यानिमित्ताने दिसून आले.
‘हे’ १३ मातब्बर नेते आले एकत्र
१) आमदार प्रा. राम शिंदे (भाजप प्रदेश उपाध्यक्ष)
२) माजी आमदार चंद्रशेखर कदम (भाजप नेते)
३) विवेक कोल्हे (भाजप नेते)
४) शीला शिंदे ( शिवसेना शिंदे गट, माजी महापौर)
५) दिलीप सातपुते ( शिवसेना शहराध्यक्ष शिंदे गट)
६) प्रा. शशिकांत गाडे (जिल्हाध्यक्ष, दक्षिण, उबाठा गट)
७) रावसाहेब खेवरे (जिल्हाध्यक्ष , उत्तर, उबाठा गट)
८) विक्रम राठोड (युवासेना सहसचिव, उबाठा गट)
९) राजेंद्र पिपाडा (माजी नगराध्यक्ष भाजप, राहता)
१०) प्रताप ढाकणे (प्रदेश सरचिटणीस, राष्ट्रवादी शरद पवार)
११) राजेंद्र फाळके (जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी शरद पवार गट)
१२) किरण काळे (शहर जिल्हाध्यक्ष कॉंग्रेस)
13)घनश्याम शेलार (बीआरएस नेते)
पक्षांतंर्गत विरोधकांबरोबरच पाच पक्ष एकत्र आल्याने ताकद वाढली
राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी नगरमध्ये आयोजित केलेल्या महानाट्य कार्यक्रमात चक्क भाजपबरोबरच शिवसेनेचे एकनाथ शिंदे गट व उद्धव ठाकरे गट, काँग्रेस, बीआरएस हे पाच पक्ष एकत्र आल्याचे चित्र दिसून आले.
स्थानिक नेत्यांची पाठ
महानाट्याच्या निमित्ताने भाजपसह शिंदे गट, अजित पवार गट लंके यांच्या कार्यक्रमासाठी एकत्र आला असताना नगर शहरातील स्थानिक भाजपच्या नेत्यांनी मात्र लंकेच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
राजकीय समीकरणे दाखवणारी नेत्यांची काही वक्तव्ये
महानाट्याच्या निमित्ताने जे मातब्बर नेते एकत्रित या स्टेजवर आले होते त्यांनी येथे जे काही राजकीय वक्तव्य केले त्यातून आगामी राजकीय समीकरणे लक्षात येतील.
– आ. राम शिंदे : आमदार लंके हे टी २० चे खेळाडू, सामान्यांच्या गळ्यातील ताईत बनलेला आमदार,
– विवेक कोल्हे : आमदार नीलेश लंके जनतेचे डॉक्टर, ते जिल्ह्याचा कॅन्सर दूर करू शकतात.
– राजेंद्र फाळके : आ. लंकेंना राजकीय कारकीर्दीत मी मदत केली. माझी मदत त्यांना माहित आहे.
– प्रताप ढाकणे : आ. लंकेयांच्यासारखा गरीब कुटुंबातील तरुण जनतेने घडवला, त्यांचा डंका नगर दक्षिणेत वाजत राहो