Ahmednagar News : मुस्लिम धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावणारे प्रक्षोभक तसेच धमकावणारे वक्तव्य केल्या प्रकरणी भाजपचे आ. नितेश राणे तसेच मोर्चाचे आयोजक दिगंबर गेंट्याल यांच्यावर नगरच्या तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नगर मध्ये रविवारी (दि.१) महंत रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात आलेल्या मोर्चाच्या समारोप सभेत आ.राणे यांनी हे प्रक्षोभक वक्तव्य केले होते. याबाबत असिफ चांदसाहब शेख (रा. बेलदार गल्ली, नगर) यांनी फिर्याद दिली आहे.
यामध्ये म्हंटले आहे की, नगर येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने महंत रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ मोर्चा आयोजित करण्यात आला होता. यामध्ये भाजप आमदार नितेश राणे देखील सहभागी झाले होते. मोर्चाचा समारोप दिल्ली गेट येथे करण्यात आला त्यावेळी या समारोपाच्या भाषणात आ. राणे यांनी मुस्लिम समाजाला जाहीर पणे धमकवले.
आम्ही ९० टक्के असून तुम्ही १४ टक्के आहात, तुमची बांग्लादेशसारखी अवस्था करू, तुम्हाला धार्मिक स्थळात घुसून मारू, महंत रामगिरी यांच्या बद्दल बोलले तर तुमची जीभ जागेवर ठेवणार नाही अशा शब्दात धमकावत धार्मिक भावना दुखावणाऱ्या आक्षेपार्ह घोषणा दिल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे.
या फिर्यादी वरून पोलिसांनी आ. नितेश राणे आणि या मोर्चाचे आयोजक दिगंबर गेंट्याल या दोघांच्या विरुद्ध बी.एन.एस. २०२३ चे कलम ३०२, ३५२ (२), ३५१ (२) नुसार गुन्हा दाखल केला आहे.