Aamdar Rohit Pawar News : येत्या काही दिवसांनी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. भारतीय निवडणूक आयोग कोणत्याही क्षणी निवडणुकांच्या तारखा जाहीर करू शकते. अशा परिस्थितीत आता राज्यात महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांच्या माध्यमातून जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. कर्जत जामखेडचे विद्यमान आमदार रोहित पवार यांनी ही तयारी सुरू केली आहे.
गेल्या निवडणुकीत पवार यांनी कर्जत जामखेड मधून तत्कालीन मंत्री आणि भाजपाचे उमेदवार राम शिंदे यांचा पराभव केला होता. दरम्यान यंदाच्या निवडणुकीत सुद्धा पवार विरुद्ध राम शिंदे असाच सामना रंगणार असे दिसत आहे.
अशातच शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी जामखेड येथील कुसडगाव येथे उभारण्यात आलेल्या एस आर पी एफ प्रशिक्षण केंद्राचे पोलिसांच्या विरोधानंतरही उद्घाटन केले. या उद्घाटन सोहळ्याच्या दरम्यान पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्ला चढवला.
तसेच त्यांनी कर्जत जामखेड मधून निवडणूक लढवण्याचे कारणही स्पष्ट केले. आमदार पवार यांनी ‘मी गेल्या निवडणुकीत कर्जत-जामखेड ऐवजी कुठल्याही मतदारसंघात उभा राहिलो असतो, पण लोकसभा निवडणुकीच्या काळात मी कर्जत-जामखेडमध्ये फिरायचो तेंव्हा मला असं वाटायचं ही लोक माझीच आहेत.
मग, त्यावेळी पवार साहेबांनी मला निवडणुकीसाठी विचारले तेंव्हा मी त्यांना सांगितले मी कर्जत-जामखेडमधूनच विधानसभा निवडणुक लढवणार आहे. त्यावेळी साहेबांनी सांगितले की तू तिथे आमदार झाल्यावरही तुझ्या स्वभावात बदल होऊ देऊ नकोस, अन साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आज मी तेच काम करत आहे.
कोरोना काळात मी प्रत्येकाची घरातील व्यक्तीप्रमाणे सेवा केली आहे,’ असं म्हणतं येथून निवडणूक लढवण्याचे कारण स्पष्ट केले. यावेळी सीआरपीएफ प्रशिक्षण केंद्र बाबत बोलताना आमदार पवार यांनी हे प्रशिक्षण केंद्र भाजपाच्या काळात बाहेर जाणार होते.
पण महाविकास आघाडीच्या काळात हे प्रशिक्षण केंद्र पुन्हा जामखेड मध्ये आणले. यावेळी पवार यांनी आम्ही कधीच सुडाचे राजकारण करत नाहीत, पण आमच्याविरोधात कुणी सुडाचे राजकारण करत असेल तर आम्ही सोडणार नाही असा इशाराही दिला आहे.
आमदार पवार म्हणालेत की मी कर्जत जामखेड चा सेवक आहे. माझ्यावर येथील जनता अपार प्रेम करते. म्हणून कर्जत जामखेडच्या लोकांना हे लोक घाबरतात. मी एसआरपीएफ केंद्राबाहेर गेलो तेव्हा येथील लोक ऐकणार नाहीत तुम्हीच त्यांना सांगा अशी पोलिसांनी मला विनंती केली.
मी जेव्हा ED कार्यालयात गेलो होतो तेव्हा देखील येथील जनता तिथे आली होती. तेव्हा त्यांनी मला ही लोक कुठून आलीत असा प्रश्न विचारला होता. त्यांना वाटत होतं हे लोक एक-अर्धा तास थांबतील आणि निघून जातील मात्र तेथे जमा झालेले लोक मागे हटले नाहीत.
यामुळे तेव्हा ED वाले देखील म्हणाले होते मान गये बॉस. ही येथील लोकांची ताकद आहे आणि म्हणून मी दिल्ली समोर झुकणार नाही. म्हणून त्यांच्यापुडे मला थांबवायचे कसे हा मोठा प्रश्न उभा राहतो. तसेच यावेळी रोहित पवारांनी मी पुन्हा आमदार होईल असा विश्वास देखील व्यक्त केला आहे.