Aashutosh Kale News : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या संपूर्ण महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापू लागले आहे. निवडणुकांच्या तारखांची घोषणा झाल्यानंतर राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. कोपरगाव विधानसभा मतदारसंघातही असेच चित्र आहे. कोपरगाव विधानसभा मतदारसंघात नेहमीच काळे आणि कोल्हे असा राजकीय संघर्ष पाहायला मिळतो. मात्र यंदाच्या निवडणुकीत काळे आणि कोल्हे हे एकाच गटात आहेत.
कोल्हे हे भारतीय जनता पक्षात आणि काळे हे अजितदादा यांच्यासमवेत असल्याने हे दोघेही कुटुंब एकाच गटाचे अर्थातच महायुतीचे भाग आहेत. पण एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाहीत असं म्हणतात. याच उक्तीप्रमाणे आता कोपरगावातील कोल्हे कुटुंब देखील महायुतीमध्ये जास्त दिवस थांबणार नसल्याचे बोलले जात आहे.
खरे तर अजून महायुती आणि महाविकास आघाडी कडून उमेदवारांची नावे फायनल झालेली नाहीत. परंतु महायुतीने सीटिंग गेटिंग हा फॉर्म्युला आणला आहे. अर्थातच ज्या पक्षाचा विद्यमान आमदार असेल त्याच पक्षाला ती जागा दिली जाणार आहे.
यानुसार कोपरगावची जागा अजितदादा गटाकडे येणार आहे. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार विद्यमान आमदार अशुतोष काळे यांनाचं यावेळी संधी देणार हे फिक्स आहे. यामुळे विवेक कोल्हे हे वेगळी भूमिका घेऊ शकतात अशा चर्चा आहेत.
नुकत्याच काही दिवसांपूर्वी कोल्हे यांनी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यांनी शरद पवार यांच्या समवेत एकाच गाडीत बसत प्रवासही केला होता. यामुळे कोल्हे हे शरद पवार गटात जातील आणि हाती तुतारी घेऊन विधानसभेच्या रिंगणात उतरतील अशा चर्चांनी गत काही दिवसांपासून नगरच्या राजकीय वर्तुळात अक्षरशा काहूर माजवले आहे.
पण अद्याप या संदर्भात युवा नेते विवेक कोल्हे यांच्याकडून कोणताच निर्णय घेण्यात आलेला नाही. अजून कोल्हे यांनी आपले पत्ते उघड केलेले नाहीत. अशातच भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युवा नेते विवेक कोल्हे यांच्या मातोश्री आणि गेल्यावेळी आशुतोष काळे यांनी ज्यांचा पराभव केला होता त्या स्नेहलता कोल्हे यांना मुंबईमध्ये पाचारण केले होते.
मुंबईमध्ये फडणवीस आणि स्नेहलता कोल्हे यांच्यात नुकतीच महत्वाची मिटींग झाली. यात नेमके काय घडले याबाबतचा तपशील समोर आलेला नाही मात्र फडणवीस यांनी कोल्हे यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला असावा अशा चर्चा आहेत. अशा या परिस्थितीतच विद्यमान आमदार आशुतोष काळे यांनी मोठे विधान केले आहे.
विद्यमान आमदार आशुतोष काळे यांनी म्हटल्याप्रमाणे, ‘माझी उमेदवारी निश्चित आहे. आता कोल्हेंनी त्यांचा निर्णय घ्यायचा आहे. मी मतदारसंघाचा केलेला विकास आणी जनतेशी असलेला जनसंपर्क, या जोरावर पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरे जाणार आहे. माझा विजय निश्चित आहे,’ असं म्हणतं आशुतोष काळे यांनी कोल्हे यांनी त्यांची भूमिका जाहीर करावी असे आव्हान केले आहे. तसेच काळे यांनी त्यांच्या विजयाचा विश्वास देखील व्यक्त केला आहे.
कोपरगाव मतदार संघात गेल्या पाच वर्षांच्या काळात जो काही विकास झाला आहे त्या विकासाच्या जोरावरच आपण मतदारांमध्ये जाऊ आणि पुन्हा विजय प्राप्त करू असे काळे यांनी म्हटले आहे. दरम्यान आता कोल्हे नेमकी काय भूमिका घेणार, ते खरंच शरद पवार गटात जाणार का हे पाहण्यासारखे ठरेल. पण जर कोल्हे शरद पवार गटात गेलेत तर पुन्हा एकदा कोपरगावात कोल्हे विरुद्ध काळे असा परंपरागत संघर्ष पाहायला मिळणार आहे.