राजकारण

शिवसेनेबरोबर युती झाल्यानंतर मला उपमुख्यमंत्री पदाची ऑफर होती – रामदास आठवले

Maharashtra News : शिवसेनेबरोबर युती झाल्यानंतर मला उपमुख्यमंत्री पदाची ऑफर होती. पण मी तसे न करता भारतीय जनता पार्टीला पाठिंबा दिला.

माजी केंद्रीय कृषीमंत्री खा. शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ‘एनडीए’ मध्ये आले असते तर त्यांचा पक्ष फुटला नसता.

‘भाजप’ने त्यांचा पक्ष फोडला नाही तर खा. पवार व ठाकरे यांना त्यांचा पक्ष टिकवता आला नाही, असा गौप्यस्फोट केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला.

मंत्री रामदास आठवले हे रविवारी सोलापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना ते पुढे म्हणाले, महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदे गट,

राष्ट्रवादी अजित पवार गट हे तीनच पक्ष असल्याचा वारंवार उल्लेख होतो. परंतु, महायुतीत रिपाइंही (आठवले गट) आहे, याचा विसर पडता कामा नये.

महायुतीच्या माध्यमातून आम्हाला सोलापूर व शिर्डी लोकसभा मतदारसंघ अशा दोन जागा मिळाव्यात. भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणार का? या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले,

महायुतीतील शिवसेनेचे एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे अजित पवार यांना त्यांच्याच पक्षाचे चिन्ह मिळाले असल्याने ते भाजपच्या चिन्हावर लढणार नाहीत. त्याच पद्धतीने आमचा पक्षसुद्धा आमच्याच चिन्हावर निवडणूक लढवेल. त्यामुळे भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याचा प्रश्नच उरत नाही.

माजी केंद्रीय कृषीमंत्री खा. शरद पवार गटाला मिळालेल्या ‘तुतारी’ या चिन्हाबाबत छेडले असता त्यांनी आपल्या खास स्टाईलने चारोळीतून उत्तर देताना सांगितले की, शरद पवारांना मिळाली तुतारी, बघुया गावागावात किती ऐकणार आहे म्हातारी.

खा. शरद पवार यांनी यापूर्वी पुलोद अर्थात पुरोगामी लोकशाही दलच्या माध्यमातून सरकार बनवताना तत्कालीन जनसंघला बरोबर घेतलेच होते ना? असा प्रतिप्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

अँड. प्रकाश आंबेडकर यांच्या ‘वंबआ’ला महाविकास आघाडीत घेण्यावरून सध्या बराच गोंधळ सुरू आहे. याबाबत चारोळीद्वारे खिल्ली उडवताना ‘वचित बहुजन आघाडीचे तळ्यात की मळ्यात, बघूया आता जातात कुणाच्या गळ्यात’ असे मंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.

अॅड. प्रकाश आंबेडकर हे मोठे नेते आहेत. आम्ही त्यांचा सन्मान करतो. महाविकास आघाडीला त्यांनी दिलेला ‘बारा’चा फॉर्म्युला योग्य आहे, अशी पुष्टी जोडायलाही ते विसरले नाहीत.

भाजप संविधान बदलत आहे, अशी दिशाभूल काही लोक करत आहेत. पंतप्रधान मोदी यांनी २०१४ साली संविधानावर माथा टेकून शपथ घेतली आहे.

त्यामुळे कुणाच्या बापाला संविधान बदलता येणार नाही, असेही त्यांनी सांगितले. यावेळी राजा सरवदे, गौतम सोनवणे, सिद्धार्थ सोनकांबळे, सोमनाथ भोसले, राजेश उबाळे, कुमार भोसले उपस्थित होते.

मराठा व धनगर आरक्षणालाही पाठिंबा
मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे; यात दुमत नाही. पण ते ‘ओबीसी ‘मधून देता कामा नये, ही आपली भूमिका आहे.

धनगर समाजाच्या नावात ‘धन’ असले तरी त्यांच्याकडे ‘धन’ नाही. त्यामुळे त्यांनाही आरक्षण मिळण्यासंदर्भात आपला पाठिबा आहे, असेही मंत्री रामदास आठवले यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts