मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा एका महिलेसोबतचा व्हिडिओ सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी हा व्हिडिओ ट्विट करत नाना पटोलेंवर टीका केली आहे. एवढेच नव्हे तर नाना पटोले यांनी त्यावर कोणतेही उत्तर न दिल्याने चित्रा वाघ यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत या सगळ्या वादाला आणखीनच हवा दिली होती. त्यानंतर नाना पटोले हे चित्रा वाघ यांच्याविरुद्ध आक्रमक झाले आहेत.
नाना पटोले यांनी चित्रा वाघ यांच्या आरोपांना जाहीरपणे प्रत्युत्तर दिले नसले तरी त्यांनी वाघ यांना न्यायालयात खेचण्याची तयारी सुरु केली आहे. नाना पटोले यांनी नागपूरमध्ये माध्यमांशी बोलताना चित्रा वाघ यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे.
महाराष्ट्रातील राजकारणाची पातळी खालवली असून माझी वैयक्तिक बदनामी करण्यासाठी ‘तो’ व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करण्यात आला. यावर आमची कायदेशीर टीम तपासणी करत असून गरज पडल्यास न्यायालयातही जाण्याची आमची तयारी आहे, असे नाना पटोले यांनी सांगितले आहे.
दरम्यान, नाना पटोलेंच्या या भूमिकेनंतर आता चित्रा वाघ या काय पाउलं उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.