Ahilyanagar News : काल महायुतीचा शपथविधी सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला. भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तसेच माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. गेल्या महायुती सरकार प्रमाणेच एक सीएम आणि दोन डीसीएम असा फॉर्मुला यावेळी पण दिसला. मात्र अजून फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार बाकी आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार येत्या सात-आठ दिवसात मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. अहिल्या नगर जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी येत्या सात-आठ दिवसात राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, खाते वाटप होईल अशी माहिती दिली आहे.
दरम्यान अहिल्यानगर जिल्ह्यातून कोणकोणत्या मातब्बर नेत्यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार हे पाहणे विशेष उत्सुकतेचे ठरणार आहे. अशा परिस्थितीत आज आपण फडणवीस सरकारमध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील कोणत्या आमदार नामदार होतील याचा आढावा घेणार आहोत.
भारतीय जनता पक्षाचे हे नाव चर्चेत
अहिल्यानगर जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदारसंघातील दहा विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार विजयी झालेत. चार उमेदवार भारतीय जनता पक्षाचे, चार उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आणि दोन उमेदवार शिवसेना शिंदे गटाचे विजयी झालेत.
भारतीय जनता पक्षाचे राधाकृष्ण विखे पाटील, मोनिका राजळे, शिवाजी कर्डिले व विक्रमसिंह पाचपुते यांनी विजयश्री खेचून आणला आहे. दरम्यान या चार पैकी राधाकृष्ण विखे पाटील हे शंभर टक्के मंत्री होणार असे म्हटले जात आहे.
तरीही त्यांना कोणते खाते मिळणार हे पाहण्यासारखे ठरेल. विखे पाटील हे शिंदे सरकार मध्ये महसूल मंत्री म्हणून काम पाहत होते. दुसरीकडे मोनिका राजळे यांनी विजयाची हॅट्रिक साधली असून महिला आमदार म्हणून त्यांचेही नाव मंत्रिपदाच्या शर्यतीत आहे.
माजी मंत्री शिवाजी कर्डिले हे सहाव्यांदा विधानसभेवर गेले आहेत. यामुळे राहुरीचे आमदार कर्डिले यांची देखील मंत्रीपदी वर्णी लागू शकते. मात्र भारतीय जनता पक्षाकडून या चर्चेतल्या नावांपैकी नेमकी कोणाला संधी मिळणार हे पाहण्यासारखे ठरेल.
अजित पवार गटाच्या या दोघांना मंत्रिपदाची लॉटरी
अजित पवार गटाने यावेळी चार जागा जिंकल्या आहेत. कोपरगाव मधून आशुतोष काळे, नगर शहर मधून संग्राम जगताप, अकोले मधून डॉक्टर किरण लहामटे आणि पारनेर मधून काशिनाथ दाते हे चौघे विधानसभेवर गेले आहेत. यातील विजयाची हॅट्रिक साधनारे संग्राम जगताप यांचे नाव मंत्रिपदाच्या शर्यतीत सर्वात पुढे आहे.
आशुतोष काळे हे देखील प्रचंड मोठ्या मताधिक्याने निवडून आले असून ते सुद्धा मंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत. आदिवासी चेहरा म्हणून डॉक्टर किरण लहामटे यांना सुद्धा मंत्रिपदाची लॉटरी लागू शकते अशा चर्चा सध्या नगरच्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत.
शिंदे गट नवख्या आमदारांना मंत्री बनवणार
अहिल्यानगर जिल्ह्यात शिंदे गटाचे दोन आमदार निवडून आलेत. संगमनेर मतदार संघातून अमोल खताळ हे बलाढ्य बाळासाहेब थोरात यांना पराभूत करून निवडून आलेत. तर दुसरीकडे नेवासा विधानसभा मतदारसंघातून गडाख यांचा पराभव करून विठ्ठलराव वकीलराव लंघे पाटील विजयी झाले आहेत.
संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार बाळासाहेब थोरात यांनी संगमनेरचे तब्बल 40 वर्ष प्रतिनिधित्व केले होते आणि ते महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा सुद्धा होते. मात्र थोरात यांना नवख्या अमोल खताळ यांनी पराभवाची धूळ चारलीये.
यामुळे शिंदे गटाकडून खताळ यांच्या बाबत सकारात्मक निर्णय होऊ शकतो आणि त्यांच्याही गळ्यात मंत्रिपदाची माळ पडू शकते अशा काही चर्चा सध्या नगरमध्ये सुरू आहेत. त्यांना निदान राज्यमंत्री तरी बनवले जाईल असे काही जाणकार सांगत आहेत.