राजकारण

नगर शहर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी ! आ. संग्राम जगतापांची प्रचारात आघाडी, नगरमध्ये जनता कोणाला कौल देणार ?

Ahilyanagar Politics : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या महाराष्ट्रात सर्वत्र प्रचार सभांचा झंझावात सुरू आहे. महायुती आणि महाविकास आघाडी मधील फायर ब्रँड नेत्यांनी संपूर्ण महाराष्ट्र आपल्या प्रचारसभांनी गाजवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन प्रमुख पक्षांमध्ये उभी फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक होत आहे आणि यामुळे या निवडणुकीकडे साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष आहे.

यंदा राज्यातील अनेक मतदारसंघांमध्ये निवडणूक फारच काटेदार होणार असे दिसते. नगर शहर विधानसभा मतदारसंघात देखील यंदाची निवडणूक खूपच रंजक होणार आहे. खरंतर या विधानसभा मतदारसंघात 2014 मध्ये मोदींची सुनामी असतानाही तत्कालीन आमदार अनिल राठोड यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे संग्राम भैय्या जगताप यांनी आसमान दाखवले होते.

अनिल राठोड यांच्याकडे नगर शहर विधानसभा मतदारसंघाचा गड बरेच दिवस राहिला. राठोड यांची या मतदारसंघावर तब्बल अडीच तपांपर्यंत सत्ता होती. मात्र जगताप यांनी राठोड यांच्या याच किल्ल्याला सुरंग लावले आणि नगर शहराचा गड राठोड यांच्याकडून काढून घेतला. जगताप यांनी गेल्या दहा वर्षात शहरावर चांगली पकड ठेवली आहे.

महत्त्वाचे म्हणजे त्यांनी महापालिकेवरही आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. दरम्यान यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही जगताप निवडणुकीच्या रिंगणात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच विधानसभेच्या निवडणुका होत आहेत आणि जगताप हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात आहेत. त्यांना या निवडणुकीत पुन्हा एकदा अजित पवार गटाने उमेदवारी दिली असून या निवडणुकीत जगताप यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा भिडू शड्डू ठोकून उभा आहे.

शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने यावेळी अभिषेक कळमकर यांना संधी दिली आहे. त्यामुळे नगर शहर विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी या सामन्याचा निकाल नेमका काय लागणार याकडे नगरकरांचे विशेष लक्ष आहे. खरेतर, नगरी राजकारणाचा अंदाज लावणे ही काही सोपी बाब नाही.

परंतु संग्राम जगताप नावाचे वादळ येण्यापूर्वी हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जात. यामुळे नगर म्हटले की शिवसेना फिक्स असे समीकरणचं होते. पण, राष्ट्रवादीने सत्ता खेचून आणल्यानंतर अन जगताप यांनी मिळालेल्या सत्तेचा सदुपयोग केल्याने या मतदारसंघाचे चित्र आता पूर्णपणे पालटले आहे. या ठिकाणी यंदाच्या निवडणुकीत तर शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून कोणताच भिडू मैदानात नाही. 2014 मध्ये ही जागा राष्ट्रवादीच्या पारड्यात आली.

पुढे शिवसेनेत दुफळी निर्माण झाली. दिवंगत नेते अनिल राठोड यांच्यानंतर कोणताही नेता शहरावर खूपसा प्रभाव टाकू शकला नाही. उलट एकमेकांचे पाय खेचण्याचे प्रकार झाले. त्यामुळे शिवसेना या ठिकाणी विस्तारली नाही. भाजपतही दुही निर्माण झाली. या ठिकाणी मोठे नेतृत्व देण्यास भाजपही असमर्थ ठरला. यामुळे 2014 मध्ये जगताप आलेत अन नंतरची निवडणूक म्हणजे 2019 ची निवडणूक सुद्धा ते जिंकलेत. दरम्यान, महायुती झाल्यानंतर भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) व शिवसेना (शिंदे गट) यातील नेते एकाच व्यासपीठावर आले आहेत.

विधानसभेच्या निमित्ताने या तीनही प्रमुख पक्षातील नेत्यांनी एकजूट दाखवित उमेदवार जगताप यांचे हात बळकट केले आहेत. महाविकास आघाडीतून राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) अभिषेक कळमकर यांना उमेदवारी मिळाली आहे. मात्र, या ठिकाणी कळमकर यांना उमेदवारी बहाल केल्यानंतर महाविकास आघाडीमध्ये बंडाळी झाली होती. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या आदेशानंतर येथील बंडखोरी शांत झाली.

मात्र, ज्या नेत्यांनी बंडखोरी केली ते खरंच कळमकर यांच्या पाठीशी उभे राहणार का ? हा मोठा सवाल आहे. दुसरीकडे विद्यमान आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचार सभांचा झंझावात संपूर्ण मतदारसंघात जोरदार सुरू आहे. जगताप जोरदार शक्ती प्रदर्शन करत आहेत. महत्त्वाचे म्हणजे जगताप यांच्या सभांना फारच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून ज्या ठिकाणी जगताप जात आहेत त्या ठिकाणी त्यांनी केलेल्या कामांचा ते हिशोबही मांडत आहेत.

ते आमदार असताना त्यांनी नगर शहरात जी कामे केलीत त्याच कामांच्या जोरावर जगताप यंदाच्या निवडणुकीत उतरले असून सध्या तरी जगताप हेच आघाडीवर दिसतायेत. यामुळे प्रचारात दिसणारी ही आघाडी विजयात रूपांतरीत होणार का हे पाहणे विशेष उत्सुकतेचे ठरणार आहे. पण, जगताप आपला गड शाबूत ठेवणार की कळमकर सुरंग लावणार? हे 23 तारखेलाचं समजणार आहे.

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com

Published by
Tejas B Shelar

Recent Posts