Ahmednagar News : सध्या महाराष्ट्रात सर्वत्र विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी सुरू आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांच्या माध्यमातून निवडणुकीसाठी तयारी सुरू करण्यात आली आहे. दोन्ही गट गत लोकसभा निवडणुकीच्या अनुभवातून आता पुढील विधानसभा निवडणुकीसाठी रणनीती तयार करण्यात व्यस्त आहेत. गत लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसला यात शंकाच नाही.
मात्र, गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये मिळालेल्या पराभवातून धडा घेत महायुती सरकारने वेगवेगळ्या विकासकामांचा धडाका लावला आहे. श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात देखील विविध विकास कामांचा धडाका सध्या सुरू असल्याचे दिसत आहे. मतदार संघातील विविध विकास कामांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी सरकारने मंजूर केला आहे.
निवडणुकीचा काळ पाहता याची जोरदार जाहिरातबाजी देखील सुरू आहे. किती निधी मंजूर झालाय, निधी कोणी मंजूर केलाय? या आशयाचे काही फलक मतदारसंघात झळकत सुद्धा आहेत. मात्र, मतदारसंघात सुरू असणाऱ्या या विकास कामांच्या गुणवत्तेकडे निवडणुकीच्या लगीन घाईत कोणाचेच लक्ष नसल्याचे दिसते.
सर्वसामान्य करदात्यांचा पैसा अगदीच वाया जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे. नेते आणि नेत्यांचे निकटवर्ती लोक टक्केवारीच्या जाळ्यात अडकले असून यामुळे कामाचा दर्जा घसरला असल्याचा आरोप होऊ लागला आहे. मात्र, या आरोपानंतर सरकारमधील नेते खडबडून जागे झाले आहेत.
तसेच ठेकेदारांचे देखील डोळे उघडले आहेत. मतदारसंघात सुरू असणाऱ्या विकास कामांकडे आता संबंधित ठेकेदारांनी विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. हिरडगाव रस्त्यावर ज्या ठिकाणी नेत्यांचा फोटो लावलेला फलक होता त्याच ठिकाणी खड्डा पडला होता.
यामुळे खड्ड्यात गाडी आदळल्यानंतर सर्वप्रथम फलकावर नजर पडत होती. त्यामुळे असा निकृष्ट दर्जा कोणी बनवलाय? या रस्त्याच्या कामावरून टक्केवारीचा विषय देखील चव्हाट्यावर आला होता. मात्र टक्केवारीचा विषय निघाल्यानंतर रस्त्याच्या ठेकेदाराने लागलीच या रस्त्यावर पडलेले खड्डे आपहुन बुजवायला सुरुवात केली.
पण, रस्त्यावर पडणारे हे खड्डे नेमके कोणाच्या आशीर्वादाने पडत आहेत? हे निकृष्ट काम नेतेमंडळीच्या आशीर्वादामुळे तर संपन्न होत नाही ना असे अनेक प्रश्न देखील यामुळे उपस्थित होऊ लागले आहेत.
फक्त या एका रस्त्याच्या कामावरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत असे नाही तर तालुक्यातील इतरही विकास कामांवर सर्वसामान्य नागरिकांच्या माध्यमातून फुली मारली गेली आहे. अनेकजण तालुक्यात झालेल्या विकासकामांच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.
महत्त्वाचे म्हणजे मतदार संघात सर्वत्र अशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. यामुळे ज्याप्रमाणे नेतेमंडळीच्या माध्यमातून मंजूर झालेल्या निधीची आणि मंजूर झालेल्या विकास कामांची जाहिरात बाजी केली जाते त्याचप्रमाणे कामाच्या गुणवत्तेची देखील माहिती दिली गेली पाहिजे असा सूर सर्वसामान्यांनी आवळला आहे.