Ahmednagar News : लोकसभा निवडणुकीनंतर आता साऱ्या महाराष्ट्राला वेध लागले आहे ते विधानसभा निवडणुकीचे. महाविकास आघाडी आणि महायुतीने आगामी निवडणुकीसाठी जय्यत तयारी सुरू केली आहे. दोन्ही गटात जागावाटपावर जोरदार खलबत्त सुरू आहे. पण अहमदनगर जिल्ह्याचे जागावाटप महायुतीसाठी डोकेदुखी ठरणार आहे. खरे तर नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला नगर शहर लोकसभा मतदारसंघाची जागा गमवावी लागली आहे.
सुजय विखे यांना येथून पराभवाचा सामना करावा लागलाय. बीजेपीला लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यात मोठा फटका बसला असल्याने आता विधानसभा निवडणुकीत तीच पुनरावृत्ती होऊ नये यासाठी पक्षाने सावध भूमिका घेतली आहे. मात्र जिल्ह्यात पुन्हा वर्चस्व मिळवण्यासाठी भारतीय जनता पक्षाला मोठमोठ्या आव्हानांचा सामना करावा लागणार आहे.
यातील सर्वात मोठे आव्हान हे जागा वाटपाचे राहणार आहे. जागा वाटपामध्ये अजितदादा गट भाजपासाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत अहमदनगर जिल्ह्यात भाजपाचे फक्त तीन आमदार निवडून आले होते. गेल्यावेळी शेवगाव पाथर्डी, श्रीगोंदा आणि शिर्डी या तीन जागांवरच भारतीय जनता पक्षाला समाधान मानावे लागले होते.
दुसरीकडे एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीने आठ जागांवर विजय मिळवला होता. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार आपल्या काही आमदारांसमवेत महायुतीत समाविष्ट झालेत. मात्र आता अजितदादांमुळेच अहमदनगर जिल्ह्यात भाजपाची कोंडी होत आहे. सध्या अजितदादा यांच्या गटात अहमदनगर जिल्ह्यात तीन विद्यमान आमदार आहेत.
कोपरगाव, नगर शहर आणि अकोले या तीन जागांवर अजित पवार गटातील आमदार आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत या जागा अजित पवार गटालाच मिळणार आहेत. कारण की, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने सीटिंग गेटिंग हा फॉर्मुला आणला आहे. अर्थातच सध्याच्या विद्यमान आमदारांच्या जागा त्याच पक्षाला मिळणार आहेत.
या फॉर्मुलानुसार कोपरगाव, नगर शहर आणि अकोले या तीन जागा अजित पवार गटाला मिळण्याची शक्यता आहे. एवढेच नाही तर अजित पवार गटातील कार्यकर्त्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाच्या काही जागांवर देखील दावा केला जात आहे. यामध्ये श्रीगोंदा आणि शेवगाव पाथर्डी या दोन जागांवर अजित पवार गटाने दावा केला आहे.
शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघातून अजित पवार गटाचे माजी आमदार चंद्रशेखर घुले निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत, तसेच श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात अनुराधा नागवडे यादेखील निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक आहेत. यामुळे निवडणुकीआधीच नगर जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाला आपल्या मित्र पक्षांचे आव्हानाला देखील तोंड द्यावे लागणार आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर नगर भाजपामध्ये बंडखोरीची देखील शक्यता आहे.
कोणत्या मतदारसंघात होणार बंडखोरी?
कोपरगावची जागा अजित पवार गटाकडे आहे, गेल्या निवडणुकीत येथून भारतीय जनता पक्षाकडून स्नेहलता कोल्हे निवडणुकीच्या रिंगणात होत्या. मात्र विद्यमान आमदार अजितदादांचा असल्याने ही जागा अजित पवार गटाला जाण्याची शक्यता असून याच पार्श्वभूमीवर स्नेहलता कोल्हे व त्यांचे सुपुत्र विवेक कोल्हे वेगळ्या विचारात असल्याचे समजत आहे. असे झाल्यास कोपरगावमध्ये भाजपासाठी मोठे आव्हान निर्माण होणार आहे.
अकोले मतदारसंघात देखील भाजपामध्ये बंडखोरी होण्याची शक्यता आहे. येथील पिचड पिता-पुत्र पुन्हा एकदा शरद पवार यांच्या गटात जाण्याची शक्यता आहे. याशिवाय नगर शहर विधानसभा मतदारसंघात देखील भाजपाचे निष्ठावान कार्यकर्ते नाराज आहेत. नगर शहरची जागा अजितदादा गटाकडे आहे. संग्राम भैय्या जगताप येथून आमदार असून यावेळी देखील ही जागा अजितदादा यांच्या वाट्याला येईल आणि येथून संग्राम भैय्या उभे राहतील असे बोलले जात आहे.
मात्र भाजपाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी ही जागा भाजपाकडेच यायला हवी अशी आग्रही मागणी केली असून असे झाले नाही तर बंडखोरी करण्याची चेतावणी भाजपच्या निष्ठावान नेत्यांकडून देण्यात आली आहे. एकंदरीत अजित पवार यांच्या आगमनाने महायुतीला विशेषतः भाजपाला फायदा कमी आणि वजाबाकीचं जास्त करावी लागणार अशी शक्यता आहे.