Ahmednagar Politics : रोहित पवार यांनी गेल्या साडेचार वर्षांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष न ठेवता सर्व कार्यकर्त्यांना कामगारांसारखी वागणूक दिली. कोणत्याही कार्यकर्त्याचा सन्मान ठेवला नाही.
रोहित पवार हे बारामती अॅग्रो कंपनी चालविल्यासारखे पक्ष चालवितात. सतत अपमानकारक वागणूक मिळाली, असे आरोप करत माजी जिल्हा परिषद सदस्य प्रा. मधुकर राळेभात यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला रविवारी रामराम ठोकला.
येत्या १५ सप्टेंबरपर्यंत मतदारसंघात फिरून कार्यकर्त्यांचे मत जाणून राजकीय भूमिका ठरविणार असल्याचे त्यांनी येथे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. प्रा. राळेभात यांनी आ. रोहित पवार यांच्यावर सडकून टीका केली.
तालुक्यातील मधुकर राळेभात यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. रविवारी जामखेड येथे पत्रकार परिषद घेऊन त्यांनी ही भूमिका जाहीर केली.
यावेळी माजी नगरसेवक मोहन पवार, दिगंबर चव्हाण, अमित जाधव, राष्ट्रवादी खर्डा शहराध्यक्ष महालिंग कोरे, राष्ट्रवादी कार्यकर्ते राजेंद्र वारे आदी उपस्थित होते.
प्रा. राळेभात म्हणाले, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शरदचंद्र पवार यांच्या प्रेरणेने आम्ही कॅबिनेट हजारो मतांनी पराभूत केले आणि रोहित पवार यांना निवडून आणले. मतदारसंघात जे कार्यक्रम होतात त्यांच्या फ्लेक्सवर प्रदेशाध्यक्ष,
जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष या पदाधिकाऱ्यांचे नाव किंवा फोटो न लावता स्वतःचे नाव, आईचे नाव व फोटो महाविकास आघाडी किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना नाव न वापरता आमदार रोहित पवार आयोजित कार्यक्रम केले जातात.
तालुक्यातील मूलभूत गरजांचा विकास न करता शासकीय इमारती बांधून मोठा विकास केल्याचा बोलबाला केला जातो. मतदारसंघात विकास झाला नाही अशी टीका त्यांनी केली.
पैसे व साहित्य वाटून आमदार होता येत नाही
२०२४ ची विधानसभा निवडणूक स्थानिक विरुद्ध बाहेरचा अशीच होईल. त्यांच्या विरोधात स्थानिक सर्व नेते एकत्र राहणार आहेत. पैसे व साहित्य वाटून आमदार होता येत नाही हे त्यांनी लक्षात ठेवावे, अशी टीका प्रा. राळेभात यांनी रोहित पवार यांच्यावर केली.