Ahmednagar Politics : आगामी विधानसभा निवडणुकीच्या आधीच काही मतदारसंघात पक्षाचा थेट उमेदवार ठरल्याची चित्रे असून त्यांनी त्यादृष्टीने प्रचारही सुरु केलाय. अनके ठिकाणी त्यांचे कार्यकर्ते भावी आमदार म्हणून थेट बोर्डही लावत आहेत.
यातीलच एक राजकीय व्यक्तिमत्व म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अॅड. प्रताप ढाकणे. आगामी विधानसभा निवणुकीत ढाकणे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रबळ दावेदार आहेत. या पक्षाकडून सध्या तरी त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.
दरम्यान त्यांचा विधानसभेच्या आधीच वाढदिवस आल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी व त्यांच्यासाठी अप्रत्यक्षपणे प्रचाराची एक नामी संधी चालून आली. दरम्यान या सर्व गोंधळात सध्या त्यांच्या एका फलकाने लक्ष वेधून घेतले आहे. त्याचीच सध्या चर्चा सुरु आहे.
माजी केंद्रीय मंत्री स्व. बबनराव ढाकणे साहेब यांनी उपेक्षित, पीडित आणि गरिबांसाठीच आयुष्यभर संघर्ष केला. गावचे सरपंच ते केंद्रीय मंत्रिपदापर्यंत मजल मारताना त्यांनी राज्यातील सर्व संविधानिक पदे भूषविली गरिबांचे कैवारी आणि संघर्षयोद्धा म्हणून संपूर्ण महाराष्ट्र त्यांना ओळखतो. हाच त्यांचा वारसा त्यांचे चिरंजीव अॅड. प्रताप ढाकणे समर्थपणे पुढे नेत आहेत.
नेमके काय आहेत फलक ?
‘ना डामडोल, ना बड्या बाता, हाच खरा बळीराजाचा नेता’, ‘वेळ प्रताप ढाकणे परिवर्तनाची संघर्ष योध्याची, संकट काळात सर्वाना पाठबळ देणारे काका’ अशा आशयाचे फलक सध्या संपूर्ण मतदारसंघात लागले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाचे सरचिटणीस प्रताप ढाकणे यांच्या मित्रमंडळाने हे फलक लावत आगामी विधानसभेला मतदारांनी ढाकणे यांनाच साथ द्यावी, असे आवाहन केले आहे. ढाकणे यांच्या समर्थकांनी संपूर्ण मतदारसंघात विविध आशयाचे फलक लावले आहे. या फलकांवर भावी आमदार प्रतापकाका,
वारसा संघर्षाचा, विचार जनहिताचा, बांधिलकी सर्वसामान्यांशी, चला संघर्षाला यशाची जोड देऊ या, अशा पद्धतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या फलकामुळे सध्या हा विषय चर्चेचा झाला आहे.
भाजपचा उमेदवार कुणी असो तगडी फाईट देणार
यापुर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत अगदी थोड्या मतांनी पराभव झाला, तरीही ढाकणे मात्र चांगलेच सक्रिय आहेत. २०१९ लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार डॉ. सुजय विखे यांना शेवगाव-पाथर्डी मतदारसंघातून सुमारे ६१ हजार मतांचे मताधिक्य मिळाले होते.
नुकत्याच झालेल्या निवडणुकीत हे मताधिक्य घटून विखे यांना केवळ साडेसात हजारांचे मताधिक्य मिळाले. हे मताधिक्य घटवण्यात ढाकणे यांची भूमिका मोलाची ठरल्याने सध्या ढाकणे यांचा आत्मविश्वास चांगलाच वाढला आहे. त्यांच्या विरोधात भाजपकडून विद्यमान आमदार मोनिका राजळे उभ्या राहिल्या किंवा इतर काही प्रयोग
भाजपने राबवला तरी देखील येथे यंदा मात्र तगडी फाईट पाहायला मिळेल हे निश्चित. त्यामुळे भाजपने आ. मोनिका राजळे असोत किंवा त्यांना डावलून इतर कुणाला तिकीट दिले तर तो उमेदवार असो भाजपचा डाव किती यशस्वी होतो हे येणारा काळच सांगेल.