Ahmednagar Politics : आज (शुक्रवार) ज्येष्ठ नेते शरद पवार अहमदनगर दौऱ्यावर असून अकोलेत येथे भव्य शेतकरी मेळावा पार पडला. निमित्त होते दिवंगत नेते अशोक भांगरे यांचा जयंती सोहळा. या मेळाव्यात शरद पवारांनी एल्गार करत विरोधकांवर चांगलीच तोफ डागली.
यावेळी शरद पवार यांनी विविध प्रश्नांवरून विविध उदाहरणे देत पंतप्रधान मोदींसह विरोधकांवर टीकास्त्र सोडले. दरम्यान त्यांनी यावेळी तुम्ही मला अनेकदा निवडून दिले आहे त्यामुळे आता आता काही मागायचं नाही असे मी ठरवले आहे.
फक्त महाराष्ट्रात सर्वसामान्यांच्या हिताचं सरकार आलं पाहिजे एवढं लक्षात घ्या अशी भावनिक साद घालत विधानसभेची तुतारी फुंकली.
डॉ. लहामटेंना जागा दाखविण्यासाठी अमित भांगरे यांना उमेदवारी?
२०१९ आ. वैभव पिचड हे भाजपमध्ये गेले. अकोलेतील जनतेने मात्र हा पक्ष बदल स्वीकारला नाही व तेथे राष्ट्रवादीचे आ. किरण लहामटे यांना निवडून दिले. दरम्यान ही देखील शरद पवार या नावाची जादू होती हे देखील नाकारून चालणार नाही.
परंतु त्यानंतर दोन वर्षांपूर्वी झालेल्या राष्ट्रवादीमधील फुटीनंतर लहामटे हे देखील शरद पवार गटाची साथ सोडत अजित पवार गटात गेले. त्यामुळे आता जस पिचड यांनी गद्दारी केली म्हणून पवारांनी राजकीय खेळी खेळल्या तस आता गद्दारी केलेल्या डॉ. लहामटेंना जागा दाखविण्यासाठी अमित भांगरे यांना उमेदवारी शरद पवार देतील असे म्हटले जात आहे.
कोण आहेत अमित भांगरे? काय आहे भांगरे परिवाराचा इतिहास ?
दिवंगत अशोक भांगरे तालुक्यात ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांचे राजकीय विरोधक म्हणून ओळखले जात होते. दिवंगत भांगरे यांनी तालुक्यातील सत्ता विरोधी राजकारण जिवंत ठेवले.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत डॉ. किरण लहामटे यांच्या विजयात, तसेच दोन वर्षांपूर्वी अगस्ती कारख्यान्याच्या सत्ता परिवर्तनात त्यांचा महत्वाचा वाटा होता. मात्र अगस्ती कारखान्याच्या उपाध्यक्षपदाची माळ गळ्यात पडल्यानंतर अल्प काळातच त्यांचे अकाली निधन झाले.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर अकोल्याचे आमदार डॉ. लहामटे यांनी हो ना करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत जाणे पसंत केले. कै. भांगरे यांच्या पत्नी, अगस्ती कारखान्याच्या उपाध्यक्ष सुनिता भांगरे व पुत्र जिल्हा बँक संचालक अमित भांगरे यांनी शरद पवार यांना साथ देण्याचा निर्णय घेतला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुतेक प्रमुख नेते डॉ. लहामटे यांच्यासोबत गेले असताना फारसा राजकीय अनुभव नसतानाही अमित भांगरे तालुक्यातील पक्षाची धुरा समर्थपणे सांभाळत आहेत. विद्यमान आमदार आणि सरकारी धोरणाविरुद्ध त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.