Ahmednagar Politics Breaking : अहमदनगर जिल्ह्यात राजकीय वातावरण चांगलेच पेटले आहे. मागील काही दिवसांत आरोप प्रत्यारोप, एकमेकांबाबत गौप्यस्फोट हे नित्याचे दिसतात. परंतु आता पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व तहसीलदारांबाबत जो गौप्यस्फोट करण्यात आला आहे त्याने मात्र प्रचंड खळबळ उडाली आहे.
शिवसेनेच्या उद्वव ठाकरे गटाने
तालुका पातळीवरचे अधिकारी मंत्र्यांच्या वाड्यावरून काम करतात अशी तक्रारच जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्याकडे केली आहे. राहाता, संगमनेर, कोपरगाव, नेवासा तालुक्यातील तहसीलदार हे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या वाड्यावर असून तेथून ते कामकाज करतात अशा शिवसेनेच्या गौप्यस्फोटाने मात्र खळबळ उडवून दिलीये.
शिवसेना उद्धव ठाकरे गट जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीला
अहमदनगर जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपीट झाली. त्यामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत, मागील नुकसान भरपाई मिळावी यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांची भेट घेत विविध समस्या मांडल्या.
यावेळी त्यांनी अशी तक्रार केली की, अधिकारी लोक केवळ पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांचेच ऐकतात. तहसीलदारांच्या मनमानी कारभारावर देखील यावेळी रोष व्यक्त करण्यात आला.
प्रशासकीय कारभारात सुधारणा करणे, तसेच पीकविम्याचे पैसे तातडीने मिळावेत अशा मागण्या करत त्या जर मान्य झाल्या नाहीत तर शिवसेना स्टाइलने आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. यावेळी नगर दक्षिण प्रमुख राजेंद्र दळवी, मुजीब शेख, प्रमोद लबडे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
पिकविम्याबाबत तक्रार आल्यास शिवसेना स्टाईलने उत्तर
नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे कांद्यासह अनेक पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी आर्थिक दृष्ट्या कोलमडला आहे. अनके ठिकाणी पंचनामे रखडले आहेत.
या सर्व ठिकाणी तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना ताबडतोब मदत मिळावी अशी मागणी शिवसेनेनं केली.शेतकऱ्यांना पीकविम्याचे पैसे मिळण्यात देखील अडचणी येतात.
तातडीने सर्व शेतकऱ्यांना विम्याचे पैसे मिळण्याचे आदेश देऊन आठ ते दहा दिवसांच्या आत ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले पाहिजेत, जर पीकविम्याबाबत शेतकऱ्यांनी काही तक्रार केली तर शिवसेना स्टाइलने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी शिवसेनेने दिला आहे.