Ahmednagar Politics : राज्य शासनाने महिलांसाठी ‘मुख्यमंत्री लाडकी बहिण’ योजना आणली. दरम्यान या योजनेचे सर्वांनीच स्वागत केले. परंतु आता दूध उत्पादक, कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठीही अशीच काहीशी योजना आणावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.
राज्य शासनाने महिलांसाठी ‘मुख्यमंत्री लाडकी बहिण’ योजनेसाठी प्रति वर्षाला ४६ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. आता लाडकी बहिण योजनेसह शासनाने शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी लाडका दूध उत्पादक व कांदा उत्पादक योजना आणावी, अशी मागणी पंचायत समितीचे माजी उप सभापती मारुती मेंगाळ यांनी केली आहे.
मेंगाळ म्हणतात, शासनाने महिला भगिनींना दिलासा देत आर्थिक स्वातंत्र, स्वावलंबन, आरोग्य, पोषणासह सर्वांगीण विकासासाठी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना आणली. यासाठी पावसाळी अधिवेशनात दर वर्षी तब्बल ४६ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. शासनाने ही योजना आणून, महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न स्वागतार्ह आहे,
मात्र गेली अनेक वर्षे महाराष्ट्रातील शेतकरी कष्टाच्या घामासाठी संघर्ष करीत आहे. शेत मालाला हमी भाव नसल्याने बळीराजा पुर्णतः कर्ज बाजारी झाला आहे. दिवसेंदिवस शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे. शेती धंदा तोट्यात आला आहे.
त्याला पर्याय म्हणून शेतकरी दूध व्यवसायाकडे लक्ष देत आहेत, मात्र पशू खाद्यांचे बाजार भाव कडाडल्याने दूध धंदा अडचणीत सापडला आहे. मुख्य पीक कांद्याला किमान ४ हजार तर दुधाला ४० रूपये प्रति लिटर हमी भाव मिळावा, यासाठी दररोज वेगवेगळ्या माध्यमातून शेतकरी संघर्ष करतात. दररोज राज्यातील काना कोपऱ्यात मोर्चे,
आंदोलने, उपोषण व रस्ता रोको करीत लढा देत आहे, अशी नाराजी व्यक्त करुन, मेंगाळ म्हणाले, महिलांना सक्षम करण्यासाठी शासनाने आशादायी निर्णय घेतला, तसा शेतकऱ्यांना आथिर्कदृष्टया सक्षम करण्यासाठी पिकाला हमी भाव मिळावा,
यासाठी खते, बियाणे व पिकांवर मारणाऱ्या औषधांच्या बेसुमार वाढलेल्या किमती कमी करून, दुधाला किमान ४० रूपये प्रति लिटर तर कांदा मुख्य पिकाला किमान ४ हजार रुपये प्रति क्विंटल भाव जाहीर करावा, अशी योजना अधिवेशनात मंजुर करावी, अशी मागणी केली आहे.
सरकार विचार करणार का?
सरकारने दूध उत्पादक, कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी काही योजना किंवा फिक्स भाव तरी जाहीर करावा अशी मागणी अनेक घटकांतून होत आहे. त्यामुळे आता शासन याबाबत काही निर्णय घेणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.