राजकारण

मविआमध्ये जागा वाटपाआधीच धुसफुस ; लंके यांच्या होमग्राउंडवर ठाकरे गटाचा डोळा; जागा मिळाली नाही तर बंड पुकारू, आता….

Ahmednagar Politics News : विधानसभा निवडणुकांच्या तारखा लवकरच जाहीर होणार आहेत. दरम्यान निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याआधीच अहमदनगर जिल्ह्याच्या राजकारणात नवनवीन राजकीय घडामोडी घडत आहेत. नगर शहर, श्रीगोंदा, शेवगाव पाथर्डी, नेवासा, कर्जत जामखेड या मतदारसंघांमध्ये राजकीय वातावरण पूर्णपणे तापलेले आहे. अशी परिस्थिती असतानाच आता नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि माजी आमदार निलेश लंके यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच पारनेर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीमध्ये धुसफूस निर्माण होत आहे.

पारनेरच्या जागेवर उद्धव ठाकरे गटाचा डोळा आहे. ठाकरे गटाने या जागेवर दावा ठोकला असून ही जागा जर सोडली नाही तर बंड पुकारू असा इशारा दिला आहे. यामुळे महाविकास आघाडीमध्ये सर्व काही अलबेल नसल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे. या मतदारसंघातील शिवसेनेचे जुने निष्ठावान नेते संदेश कार्ले यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

संदेश यांनी ही जागा ठाकरे गटाला मिळायला हवी अशी भूमिका घेतली असून या भूमिकेला ठाकरे गटातील कार्यकर्त्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून फुल सपोर्ट असल्याचे बोलले जात आहे. यामुळे मात्र खासदार निलेश लंके यांच्या गोट्यात आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अस्वस्थता पसरली आहे.

खरे तर 2019 मध्ये या जागेवरून खासदार निलेश लंके विजयी झाले होते. मात्र त्यांनी नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि विजयी देखील झालेत. यामुळे आता पारनेरची जागा महाविकास आघाडीकडून कोणाला? असा प्रश्न उपस्थित होत होता.

गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा आमदार या जागेवरून निवडून आला असल्याने शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस या जागेवर नक्कीच दावा ठोकणार आहेत. मात्र जागा वाटपा आधीच ठाकरे गटातील संदेश कार्ले यांनी या जागेवर दावा ठोकला असून जर जागा आम्हाला सुटली नाही तर बंड पुकारू अशी भूमिका मांडली आहे.

कार्ले यांनी असे म्हटले आहे की, “पारनेर-नगरची जागा शिवसेनेकडे मागत आहोत. तुकाराम गडाख, दिलीप गांधी, सुजय विखे इथं खासदार झाले. राष्ट्रवादीचा क्लेम नसताना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा खासदार झाला”. शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे पारनेर-नगर मतदारसंघातील राष्ट्रवादीचा आमदार खासदार झाला आहे.

त्याची पावती म्हणून पारनेर-नगरमध्ये त्यांना थांबवा आणि ही जागा शिवसेना उबाठा पक्षाला द्यावी, अशी मागणी त्यांनी यावेळी उपस्थित केली. पुढे बोलताना त्यांनी असे म्हटले आहे की, या जागेवरून तीन वेळा शिवसेनेचा आमदार राहिला आहे.

गेल्यावेळी मत विभाजन झाले आणि राष्ट्रवादीचा आमदार निवडून आला. शरद पवार गटाच्या आमदाराला खासदार बनवण्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचा मोठा वाटा आहे. त्यामुळे ही जागा उबाठा शिवसेनेला मिळायला हवी अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे.

महत्त्वाचे म्हणजे मविआचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून उद्धव ठाकरेंना पुढे आणले जात नाहीये यामुळे शिवसैनिकांमध्ये असंतोषाची भावना असल्याचेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले आहे. एकंदरीत जागा वाटपा आधीच महाविकास आघाडीमधील धुसपुस चव्हाट्यावर आली आहे. यामुळे आता महाविकास आघाडी ही जागा कोणाला देते हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com

Published by
Tejas B Shelar

Recent Posts