राजकारण

नगर शहर विधानसभा मतदारसंघात चूरस वाढली ! आमदार संग्रामभैय्या जगताप यांच्या विरोधात ठाकरेंच्या ‘या’ शिलेदाराने थोपटलेत दंड

Ahmednagar Politics News : येत्या काही दिवसांनी महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकांचा थरार पाहायला मिळणार आहे. 26 नोव्हेंबरला महाराष्ट्राची विधानसभा विसर्जित होणार आहे. पण, राज्याची विधानसभा विसर्जित होण्याआधीच निवडणूक आयोग विधानसभेच्या निवडणुका घेणार आहे. निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील विधानसभा विसर्जित होण्याआधीच निवडणुका होतील असे नुकतेच जाहीर केले आहे.

भारतीय निवडणूक आयोग विजयादशमी नंतर कुठल्याही क्षणी निवडणुकीच्या तारखा जाहीर करू शकते. अशा परिस्थितीत, महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या माध्यमातून आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने जोरदार पूर्वतयारी सुरू करण्यात आली आहे. इच्छुक नेत्यांनी तर आत्तापासूनच रंगीत तालीम सुरू केली आहे.

अजून महाविकास आघाडी आणि महायुतीचे जागावाटप फायनल झालेले नाही. या दोन्ही गटाकडून कोणत्या मतदारसंघातून कोणाला संधी मिळणार? हे अजून ठरलेले नाही. परंतु महायुतीने सीटिंग गेटिंगचा फॉर्मुला आणला आहे. या अंतर्गत विद्यमान आमदारांच्या पक्षांनाच जागा दिली जाणार आहे.

म्हणजेच यंदाच्या विधानसभा निवडणुकीत नगर शहर विधानसभा मतदारसंघात अजित पवार गटाचा उमेदवार उभा राहणार आहे. अजितदादा विद्यमान आमदार संग्राम भैया जगताप यांना संधी देणार आहेत. पण महाविकास आघाडीकडून येथून कोण उभे राहणार हा मोठा यक्षप्रश्न आहे.

कारण की महाविकास आघाडी मधील इच्छुकांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे. खरंतर नगर शहरात शिवसेनेची राजकीय ताकद चांगलीचं जबरदस्त आहे. शिवसेनेची येथील राजकीय पकड पाहता ही जागा महाविकास आघाडी मध्ये ठाकरे गटाला सुटू शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे ठाकरे गटाकडून उमेदवारासाठी चाचपणी सुरू करण्यात आली आहे.

पण, या जागेसाठी पक्षाचे जिल्हाप्रुख प्रा. शशिकांत गाडे यांच्यासह स्वर्गीय माजी आमदार अनिल राठोड यांच्या पत्नी शशिकला राठोड, विक्रम राठोड, माजी महापौर भगवान फुलसौंदर, शहर प्रमुखसंभाजी कदम, बाळासाहेब बोराटे, गिरीश जाधव हे देखील इच्छुक आहेत.

पक्षाचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांनी शहरात आरोग्य शिबिराचे आयोजन करत आगामी निवडणुकीसाठी साखर पेरणीचा कार्यक्रम हाती घेतला आहे. तर निष्ठावंत शिवसैनिकांच्या माध्यमातून मतदारसंघातील दिवंगत माजी आमदार अनिल राठोड यांच्या पत्नी शशिकला राठोड किंवा त्यांचे सुपुत्र विक्रम राठोड यांनाच उमेदवारी दिली गेली पाहिजे अशी मागणी केली जात आहे.

दरम्यान सर्व इच्छुक नेत्यांनी नुकतीचं उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. यावेळी ठाकरे यांनी नगरची जागा जिंकायची असून एक नाव फायनल करा आणि एकदिलाने काम करा अशा सूचना मतदार संघातील पदाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. यामुळे ठाकरे गटाकडे ही जागा गेली तर या इच्छुकांपैकी कोण उभे राहणार हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

महाविकास आघाडीमध्ये इच्छुकांची भाऊ गर्दी

नगर शहर विधानसभा मतदारसंघ लढवण्याची इच्छा फक्त ठाकरे गटाचीच नाही तर शरद पवार गट आणि काँग्रेसने देखील या जागेवर निवडणूक लढवण्याचा चंग बांधला आहे. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून माजी महापौर शरद कळमकर हे निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत.

काँग्रेसकडून शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी सुद्धा या जागेसाठी तयारी सुरू केली आहे. याशिवाय माजी महापौर आणि लांडे खून प्रकरणातील आरोपी संदीप कोतकर हे देखील महाविकास आघाडी कडून निवडणूक लढवण्याच्या शर्यतीत असल्याचे बोलले जात आहे. यामुळे महाविकास आघाडी या जागेवरून नेमकी संधी कोणाला देणारा हाच मोठा प्रश्न आहे.

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com

Published by
Tejas B Shelar

Recent Posts