राजकारण

अहमदनगर शहर विधानसभा : आमदार जगताप यांच्या विरोधात साडू संदीप कोतकर निवडणूक लढवणार ? शिवाजी कर्डिले यांचे दोन्ही जावई आमने-सामने

Ahmednagar Politics News : अहमदनगर हा महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा. याला सहकाराची पंढरी असेही म्हणतात. नगर जिल्ह्यात आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना उभा राहिला होता. सहकाराचा मोठा दांडगा इतिहास असणारा हा जिल्हा सहकारव्यतिरिक्त आणखी एका कारणासाठी विशेष चर्चेत असतो आणि ते कारण म्हणजे जिल्ह्याचे राजकारण. जिल्ह्यात सोयऱ्या-धायऱ्यांचे राजकारण चालते, हे आपणास सर्वांना चांगलेच ठाऊक आहे. मात्र, येथे सत्तेसाठी सगेसोयरेचं एकमेकांच्या विरोधात उभे ठाकतात, येथे नेहमीच सोयीचे डावपेच खेळले जातात.

कधी सोयरे वेगळ्या पक्षात असले तरी एकमेकांना साथ देत पुढे नेण्याचे तर कधी एकमेकांच्या मदतीने सोयऱ्यालाच पाडण्याचे राजकारण येथे होत असते. दरम्यान, महाराष्ट्रात येत्या काही दिवसांनी विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार असून आगामी विधानसभा निवडणुकीतही सगे-सोयरे एकमेकांच्या विरोधात उभे ठाकणार असे चित्र तयार होत आहे. खरे तर नुकत्याच काही दिवसांपूर्वी देशात लोकसभेच्या निवडणुका झाल्यात आणि आता राज्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत.

या आगामी निवडणुकांकडे साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष आहे. भारतीय निवडणूक आयोगाने नोव्हेंबर मध्ये महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होतील असे संकेत दिले आहे. दरम्यान यंदाची अहमदनगर जिल्ह्यातील नगर शहर विधानसभा मतदारसंघातील निवडणूक विशेष आकर्षणाचा विषय ठरणार असे दिसत आहे. कारण की या मतदारसंघात दोन साडू एकमेकांच्या विरोधात दंड थोपटताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. भाजपाचे नेते आणि माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांचे दोन्ही जावई एकमेकांविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चांनी आता जोर पकडला आहे.

नगर शहर विधानसभा मतदारसंघात सध्या अजित दादा गटातील संग्राम भैया जगताप हे विद्यमान आमदार आहेत. संग्राम भैय्या जगताप हे शिवाजीराव कर्डिले यांचे जावई आहेत. मात्र या जागेवरून शिवाजीराव कर्डिले यांचे दुसरे जावई म्हणजेच माजी महापौर संदीप कोतकर हे देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास उत्सुक आहेत. अर्थातच यावेळी कर्डिले यांचे दोन जावई एकमेकांना आव्हान देणार आहेत. काहीही झाले तरी आपण निवडणूक लढवणारच अशी भूमिका कोतकर यांनी घेतली आहे. विद्यमान आमदार संग्राम भैय्या जगताप यांना अजून अजित पवार गटाकडून उमेदवारी जाहीर झालेली नाही मात्र उमेदवारी त्यांच्याच वाटेला येणार अशी शक्यता दाट आहे.

अशा परिस्थितीत आता भाजपाचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव कर्डिले आपल्या जावयांची समज काढण्यात यशस्वी होतील का, यावर कर्डिले काय तोडगा काढणार? कोणत्या जावयाला निवडणूक लढवण्यापासून रोखतील? या गोष्टी विशेष पाहण्यासारख्या ठरणार आहेत. कोतकर हे 2008 मध्ये घडलेल्या लांडे खून प्रकरणातील आरोपी आहेत. मात्र सध्या ते जामीनावर बाहेर आहेत. मात्र त्यांना जिल्हाबंदी आहे. ते जामीनावर बाहेर असल्याने निवडणूक लढवण्यास पात्र ठरतात मात्र जिल्हा बंदी असल्याने त्यांना निवडणूक लढवण्यात अडचण येऊ शकते असे जाणकारांनी म्हटले आहे.

हेच कारण आहे की, त्यांनी जिल्हा बंदी उठवली गेली पाहिजे यासाठी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे कोतकर यांच्यासाठी लागू असणारी जिल्हा बंदी उठवली जाते का यावरच कोतकर यांच्या निवडणुक लढवण्याबाबतचे पुढील भवितव्य ठरणार आहे. खरंतर कोतकर निवडणूक लढवणार या चर्चांना गणेशोत्सवाच्या काळात उधाण आले. कोतकर यांच्या मंडळांनी गणेशोत्सवाच्या काळात जोरदार बॅनरबाजी करत ते पुन्हा एकदा अहमदनगरच्या राजकारणात सक्रिय होतील असे संकेत दिले होते. पुढे या गोष्टीला त्यांच्या एका फेसबुक पोस्टने अधिक हवा दिली. या फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी निवडणूक लढवण्याबाबतचे संकेत दिले होते.

संदीप कोतकर यांनी लिहिलेली फेसबुक पोस्ट खालील प्रमाणे

माझ्या प्रियनगरकरांनो,
नमस्कार…
गेली अनेक दिवसांपासून मी माझ्या व्ययक्तिक अडचणींमुळे आपल्याशी हितगूज करू शकलो नाही. परंतू आता वेळ आलीय बोलायची… म्हणून आपल्याशी हितगूज करतोय… नगर शहर विकसित व्हावं, शहराचे रुपडे बदलावे हे स्वप्न मी पाहिलं. महापौर पदाच्या काळात केडगाववासियांचा अत्यंत जिव्हाळ्याचा पाणी प्रश्न, केडगाव पाणी पुरवठा योजना, शहर पाणी योजना, शहरातील रस्ते, आरोग्य सेवा आणि इतर नागरी सुविधांमध्ये सुधारणा करण्यात आपल्या पाठबळामुळे काही प्रमाणात का होईना यश आले. याचे साक्षीदार तुम्ही आहातच. अजूनही नगर शहरात विकासाची कामे करण्याजोगे खूप काही आहे.

तरुणांच्या हाताला रोजगार, महिलांची सुरक्षितता, शिक्षणासाठी सोयी सुविधा, पाणी, आरोग्य, उच्च शिक्षण, एमआयडीसी उद्योगधंदे यावर काम करणं मला आवश्यक वाटतं. नगर शहर विकसित व्हावं यासाठी मनापासून खूणगाठ बांधलीय. पण नगर शहराच्या बाबतीत पाहिलेलं स्वप्न काहीस मागे पडलंय. आपल्याशी हितगूज करतांना मनाला खूप वेदना होतायेत. पण आपल्या नगर शहराला पुणे, नाशिकच्या बरोबरीने का होईना न्यायचेय. ही मनोमन इच्छा आहेच. महापौर पदाच्या काळात शहराच्या विकासासाठी नगरकरांनो आपण मला लाख मोलाची साथ दिली. तुम्ही दिलेली साथ माझ्या आयुष्यात विसरणं कदापीही शक्य नाही.

नगरकरांशी जोडलेली माझी नाळ आजही कायम आहे. त्यात थोडासाही बदल झालेला नाही. आणि होणारही नाही. गणपती विसर्जनाच्या वेळी माझ्या एका आवाहनावर तूम्ही हजारोंच्या संख्येने स्पंदन प्रतिष्ठानच्या आयोजित गणपती विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेतला. आणि गणपती बाप्पाच्या ऐतिहासिक मिरवणुकीचे साक्षीदार झालात. हीच गणपती विसर्जनाची भव्य मिरवणूक नगर शहराला वेगळी दिशा देणारी ठरणार आहे.

माझ्यावर आपले असलेले अतूट प्रेम या मिरवणुकीतून दिसून आले. अन ह्दय भरुन आले. नगरकरांनो आपण माझ्यावर दाखविलेला विश्वास हा कदापीही तूटू देणार नाही हा माझा तूम्हाला शब्द आहे. कोणी पुढे जात असेल तर त्याला मागे ओढण्याचा प्रयत्न केला जातो. तसाच काहीसा प्रयत्न माझ्या बाबतीतही केला जातोय… पण आता मी थांबणार नाही… मागे हटणार नाही….नगरकरांना दिलेला शब्द…. शहर विकासाचं पाहिलेलं स्वप्न… पूर्ण करण्यासाठी मागे हटणार नाही…

शहराच्या विकासावर आपण नंतर बोलूच….!
सत्य परेशान हो सकता है
लेकिन पराजित नही…
लवकरच भेटूयात…
आपलाचं,
संदीप कोतकर
माजी महापौर

निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यास कोतकर यांना कोण तिकीट देणार?

सध्या नगरच्या राजकीय वर्तुळात संदीप कोतकर निवडणुकीच्या आखाड्यात जर उतरण्यासाठी सज्ज झाले तर त्यांना महाविकास आघाडी कडून तिकीट मिळणार अशा चर्चा सुरू आहेत. परंतु महाविकास आघाडीमध्ये समाविष्ट असणाऱ्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट या तिन्ही पक्षाकडून दुजोरा मिळालेला नाही. पण इथे एक गोष्ट आवर्जून नमूद करावीशी वाटते की, लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आनंदी झालेल्या महाविकास आघाडी मधील घटक पक्षातील अनेक नेत्यांच्या माध्यमातून नगर शहर मधून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त होत होती.

पण, जेव्हापासून कोतकर निवडणूक लढवणार अशा चर्चा सुरू झाल्या आहेत तेव्हापासून ही इच्छुक नेते मंडळी जणू काही गायबच झाली आहे. यावरून जर कोतकर यांना निवडणूक लढवण्यात कोणतेही तांत्रिक कारण आड आल नाही तर ते नगर शहरातून महाविकास आघाडीकडून निवडणूक लढू शकतात अशा चर्चांना बळ मिळू लागले आहे. असे झाल्यासं साडू-साडू आमने-सामने येणार आहेत. तसेच, कोतकर यांनी स्वतः जगताप यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याची त्यांची तयारी असल्याचे जाहीर केले आहे. यामुळे यंदाची नगर शहर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक कोतकर यांच्या इंट्रीमुळे अधिक रंजक आणि काटेदार होण्याची शक्यता आहे. जर कोतकर विरुद्ध जगताप अशी लढत झाली तर निवडणुकीचा निकाल लागण्याआधीच शिवाजीराव कर्डिले यांचे एक जावई विजय होणार एवढे मात्र खरे आहे.

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com

Published by
Tejas B Shelar

Recent Posts