Ahmednagar Politics : आगामी विधानसभेच्या अनुशंघाने भाजपची भाजप कार्यकर्त्यांची बैठक शेवगावमधील राजळे मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. यावेळी केंद्रीय मंत्री रक्षा खडसे आल्या होत्या व त्यांनी यावेळी अनेक गोष्टींवर गुप्तगू केल्याची माहिती समजली आहे.
राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येण्यासाठी सर्वांना मेहनत घ्यावी लागेल. महायुतीच्या बॅनर खालीच आगामी निवडणुका होतील. कार्यकत्यांनी पक्ष नेतृत्वाची भूमिका व त्या मागील गरज समजावून घ्यावी. मतभेद, वादविवाद विसरा, मतदारांमध्ये कोणत्याही प्रकारे नकारात्मक संदेश जाऊ न देता सोशल मीडियाचा प्रभावी वापर करण्याचे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी केले.
यावेळी माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, अर्जुन शिरसाठ, जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, बाजार समितीचे सभापती अॅड. सुभाष बडे, तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष संदीप पठाडे, काशीबाई गोल्हार, कुंडलिक आव्हाड, नंदकुमार शेळके, अशोक चोरमले आदिसह पाथर्डी शेवगाव तालुक्यातील निवडक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
जरांगे पॅटर्न, पिक विमा, कृषी विषयक योजना, तरुणांसाठीची स्वतंत्र भूमिका, योजनांचा प्रसार व चर्चा अशा विविध मुद्यांवर पदाधिकाऱ्यांनी मते मांडली. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी आमदार मोनिका राजळे होत्या.
यावेळी बोलताना खडसे म्हणाल्या, सर्वसामान्यांसह समाजातील विविध घटकांसाठी शासनाने जाहीर केलेल्या योजनांची माहिती व उपयोगिता कार्यकत्यांनी तळागाळापर्यंत जाऊन स्पष्ट करावी. मोनिका ताईंना यावेळी खूप मतदान व्हावे असे वाटत असेल तर त्यांनी केलेली विकास कामे पक्षाचा संदेश व प्रतिमा लोकांपर्यंत पोहोचवावी लागेल. विधानसभा निवडणूक म्हणजे कार्यकर्ता पातळीवर संपर्क व परिश्रमाची कसोटी पाहणारी निवडणूक ठरुन आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती,
नगरपालिकेसह इतर सर्वच निवडणुकांमध्ये अशा संपर्क मोहिमेचा लाभ होणार आहे. आपण गाफील राहिलो, अति आत्मविश्वासात वावरलो तर त्याचे परिणाम लोकसभा निवडणुकीत आपण भोगले. राज्यात विरोधकांचाही जोर वाढला आहे याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. नगर जिल्ह्यासह राज्याशी मुंडे परिवाराचे मोठे नाते राहिले आहे. शेवगाव पाथर्डी मतदारसंघावर तर मुंडे घराण्याचा मोठा प्रभाव आहे. पक्षाच्या माध्यमातून बचत गट चळवळीकडे पोहोचावे.
एका तालुक्यात किमान बचत गट महिलांचे १५ भव्य मेळावे जिल्हा परिषद अथवा पंचायत समिती गणनिहाय घेऊन आपले कार्य व विचार त्यांचे पर्यंत पोहोचवावे. महिलांच्या खात्यात पैसे आले की नाही, त्यातील अडचणी व पूर्तते विषयी काय करता येईल, याबाबत बूथनिहाय आढावा कार्यकत्यांकडून अपेक्षित आहे.
सोशल मीडिया, नव मतदार, तरुण मतदारांवर लक्ष केंद्रित करून गणेशोत्सवातही कार्यकर्त्यांनी विशेष संपर्क अभियान विविध प्रकारे राबवावे. सोशल मीडियाच्या माध्यमातून विरोधकांनी न्यारेटिव्ह सेट करत यापूर्वी आपल्याला आव्हान दिले आहे, याची जाणीव ठेवत आतापासून नियोजन करावे.
पक्षाशी संबंधित नसलेल्या पण पक्षीय विचार धारेशी ठाम राहिलेल्या समाजातील पक्षनिष्ठ, बुद्धिजीवी वर्गाशी कार्यकत्यांनी संपर्क वाढवून त्यांनाही सल्लामसलतीसाठी वेळ द्यावा, मतदार याद्यांचे अवलोकन गांभीर्याने करा. सरकारवर प्रत्येक गोष्टीत अवलंबून न राहता आपण काय करू शकतो याचा विचार करा.
सरकार म्हणजे सपोर्ट सिस्टीम म्हणून काम करणार आहे. विधानसभा जिंकायची आहे, अशा जिद्दीने कामाला लागा तक्रारी,गटबाजी, टीका टिपणी, दुर्लक्षित करा. भाजपच्या यशामध्ये संघ परिवाराचा मोठा वाटा आहे. देश, पक्ष व त्यानंतर आपण असा विचार करा.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काळात बँकिंग प्रणाली घरा घरात परिचित होऊन देश आर्थिक व तांत्रिक साक्षरतेकडे वेगाने झेपावला. पद असो किंवा नसो. कार्यकर्ता म्हणून काम करताना ते पद कोणीही हिरावून घेऊ शकत नाही.
असे खडसे म्हणाल्या. आमदार मोनिका राजळे यांनी लोकसभा निवडणुकीचा आढावा घेऊन केंद्रीय मंत्री मतदार संघात प्रथमच येऊन कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर लक्ष केंद्रित करून शासनाच्या योजना, कार्यपद्धती, लोकांपर्यंत पोहोचवाव्यात. मतदारसंघात एक लाख चार हजार महिला लाडकी बहीण योजनेला पात्र ठरले आहे. हा मतदार संघातील विक्रमच म्हणावा लागेल. असा गौरवपूर्ण उल्लेख त्यांनी केला.