Ahmednagar Politics : विधानसभेच्या अनुशंघाने सध्या तयारी सुरु झाली आहे. सर्वच इच्छुक नेते तयारीला लागले आहेत. दरम्यान नुकतेच माजी खा. सुजय विखे यांनी राहुरीतून उभे राहणार असे म्हटले होते. त्यानंतर मग माजी आ. शिवाजी कर्डिलेंचे काय असाही प्रश्न पडू लागला होता.
परंतु आता विखे-कर्डिलेंचे ‘तुझ्या गळा माझ्या गळा…’ असे काहीसे सूर येऊ लागलेत. सुजय विखे पाटील यांनी म्हटले आहे की, लोकसभेवेळी माझ्या विजयासाठी माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी खूप मेहनत घेतली. तसेच, पूर्वीच्या लोकसभा निवडणुकीतही कर्डिले यांनी खूप मेहनत घेतली होती.
त्यांच्यामुळेच नगर-राहुरी विधानसभा मतदारसंघात मताधिक्य मिळाले. आजपर्यंत मी त्यांच्या मार्गदशनाखाली राजकारण करत आलो आहे. त्यांच्या नेतृत्वाखालीच मी काम करणार आहे. त्यामुळे राहुरी विधानसभा मतदारसंघात शिवाजी कर्डिले हेच भाजपचे उमेदवार असतील, त्यांच्या विजयासाठी आता मी प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया दिलीये.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत डॉ. सुजय विखे पाटील यांना राहुरी विधानसभा मतदारसंघातून मोठे मताधिक्य मिळाले. त्यामुळे डॉ. सुजय विखे पाटील राहुरी मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीत उतरतील, असा अंदाज होता. मात्र, डॉ. सुजय विखे पाटील बोलताना म्हणाले,
की २०१९ व २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत माझ्या विजयासाठी शिवाजी कर्डिले यांनी प्रचंड मेहनत घेतली. तसेच, कर्डिले हे या मतदारसंघातून दोनदा आमदार राहिले आहेत. त्यामुळे राहुरी मतदारसंघात कर्डिले हेच लढवणार आहेत.
तर दुसरीकडे विखे पाटील राहुरीतून लढले तर तुम्ही श्रीगोंदेतून लढणार का असे माजी आ.कर्डीले यांना विचारले असता त्यांनी पक्ष जो आदेश देईल ते मान्य असेल असे म्हटले होते. म्हणजे तेही विखे यांच्यासाठी पॉझिटिव असल्याचे जाणवते. त्यामुळे दोघेही एकमेकांना सहकार्य करत आगमी विधानसभा लढवतील अशी चर्चा आहे.
अजित दादांवर कुरघोडी?
राहुरीच्या जागेवर अजित पवार गटाचा दावा आहे. तसे ज्येष्ठ नेते तटकरे यांनी ते बोलूनही दाखवले होते. त्यानंतर राहुरी मतदारसंघातून भाजपचे माजी आमदार चंद्रशेखर कदम यांचे चिरंजीव माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी अजित पवार गटाकडून लढण्यासाठी फिल्डिंगही लावली असल्याची चर्चा होती.
परंतु असे असूनही येथे विखे-कर्डिले दावा करत असल्याने अजित दादांवर कुरघोडी होईल का? अशी चर्चा आहे.