Ahmednagar Politics : पुण्याच्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटटच्या गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत शरद पवारांनी भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे यांना हेरलं आणि पवार यांनी पुण्यातील बैठकीनंतर कोल्हे यांना आवर्जून बोलावून आपल्या गाडीत शेजारी बसवून पुढचा प्रवास केला.
त्यामुळे आता नगर जिल्ह्यात पवारांकडून नव्याने खेळी खेळली जात असल्याच्या चर्चांना उधाण आले. माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांचे नातू विवेक कोल्हे हे शरद पवार यांच्या गाडीत बसून गेल्याने कोपरगाव मतदारसंघात कही खुशी कही गम सुरु झाले.
विवेक कोल्हे विधानसभेला तुतारी हाती घेणार अशा चर्चा सुरु झाल्या. परंतु आता या चर्चांवर आता फुलस्टॉप लागलाय. कारण या भेटीवर हाती तुतारी घेण्यावर स्वतः विवेक कोल्हे यांनीच प्रतिक्रिया दिलीये.
काय म्हणाले विवेक कोल्हे?
विवेक कोल्हे यांनी पवार-कोल्हे भेटीवर बोलतांना सांगितले की, ही भेट काही आवर्जून घेण्यात आली नव्हती. मुद्दामून भेट घ्यायची म्हणून गेलो नव्हतो.
परंतु वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटटच्या गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीसाठी गेलो होतो. ही बैठक अडीच तास चालली. त्यानंतर निघताना शरद पवार यांनी मला गाडीत बसण्याचा इशारा केला. मी बसलो.
त्यानंतर स्वाभाविक ज्या चर्चा होतात तशा चर्चा झाल्या. राजकीय काही बोललो नाहीत. राहिला विषय हाती तुतारी घेण्याचा तो माझा विषय नाही. हा विषय कौटुंबिक सदस्य, कार्यकर्ते ठरवतील.
त्यानंतर निर्णय होईल. परंतु आम्ही आज भाजपात आहोत. जेथे आम्ही असतो तेथे आम्ही प्रामाणिक काम करतो. आम्ही भाजपसाठी प्रामाणिक काम केलं आहे.
भाजप आम्हाला न्याय देईल अशी आमची खात्री आहे असं कोल्हे यांनी म्हटलं.