Ajit Pawar : राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये त्यांनी अनेक घोषणा केल्या आहेत. असे असताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मात्र यावर संताप व्यक्त करत या अर्थसंकल्पाची हवाच काढून घेतली. एका तासाच्या भाषणात ते म्हणाले, शेतकऱ्यांच्या पिकाला भाव नाही, नैसर्गिक आपत्तीत झालेल्या नुकसाची भरपाई त्याला मिळत नाही.
पीक विमा कंपन्यांकडून दावे नाकारले जातात, खत, बियाणांचे दर मोठ्याप्रमाणावर वाढलेले आहेत. उत्पादन खर्च वाढला आहे, हमी भावानुसार खरेदी होत नाही, हमी भाव वाढविण्याचा निर्णय सरकार घेत नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, असे म्हणत त्यांनी सरकारवर जोरदार हल्ला केला आहे.
असे किती तरी शेतकऱ्यांचे प्रश्न असताना या प्रश्नावर उपाययोजना सरकारला करावीशी वाटली नाही. शेतकऱ्याची थट्टा चालवली आहे का? असा सवाल अजितदादांनी सत्ताधाऱ्यांना विचारला. यामुळे वातावरण चांगलेच तापले होते.
अजित पवार यांनी तासभराच्या भाषणाने सभागृह गाजवले. अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्र्यांनी मुद्दा क्रमांक १२६ आणि १६५ हे दोन महत्वाचे मुद्दे गाळले आहेत. त्याचा सरकारकडून खुलासा करण्याची मागणीही त्यांनी केली.
केवळ घोषणांचा अवकाळी पाऊस पाडण्याचे काम अर्थसंकल्पातून झाले आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या आशा-आकांक्षा वाहून गेल्या आहेत. या अर्थसंकल्पातून सर्वसामान्य जनतेची घोर निराशा झाली आहे. हा अर्थसंकल्प म्हणजे बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात आहे, असेही ते म्हणाले.
या राज्याच्या अर्थसंकल्पाने सर्वसामान्य जनतेची घोर निराशा झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या सारख्या हुशार अर्थमंत्र्यांच्याकडून अनेक अपेक्षा होत्या मात्र फडणवीस सपशेल अपयशी ठरले आहेत, असेही पवार म्हणाले.