Ajit Pawar : काल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे होर्डिंग्ज मुंबईत झळकले होते. यावरील मजकूर वाचून एकच चर्चा सुरू झाली आहे. या होर्डिंगवर महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांचा उल्लेख करण्यात आला आहे.
यामुळे याची एकच चर्चा सुरू झाली. असे असताना यावर आता स्वता अजित पवारांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पवार म्हणाले, काही उत्साही कार्यकर्त्यांनी मी मुख्यमंत्री व्हावं म्हणून बॅनर लावले, पण 145 आमदारांच्या पाठिंब्याशिवाय मुख्यमंत्री होता येत नाही.
त्यामुळे जरी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर लागले तर ते मनावर घेऊ नका. त्या पोस्टरला फार महत्त्व देऊ नका असे अजित पवार म्हणाले. मुंबईत हे पोस्टर लावण्यात आले होते. याचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे देखील पोस्टर अशाच प्रकारे लावण्यात आले होते.
दरम्यान, महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री, एकच दादा, एकच वादा, अजित दादा, अशा आशयाचा मजकूर या होर्डिंगवर लिहिलेला आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी एका कार्यक्रमात अजित पवारांना पुढील मुख्यमंत्री करण्यासाठी कामाला लागण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले होते.
त्यानंतर जयंत पाटील यांचे भावी मुख्यमंत्री अशा आशयाचे पोस्टर्स झळकल्यामुळे राष्ट्रवादीत सध्या मुख्यमंत्री पदासाठी दोन गट पडले असल्याचे दिसून येत आहे. यामुळे भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार आलेच तर कोण मुख्यमंत्री होणार हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.