Ajit Pawar poster : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांचेही होर्डिंग्ज मुंबईत झळकले आहेत. यावरील मजकूर वाचून एकच चर्चा सुरू झाली आहे. या होर्डिंगवर महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदासाठी रस्सीखेच सुरु झाली असल्याचे दिसून येत आहे.
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे देखील पोस्टर अशाच प्रकारे लावण्यात आले होते. दरम्यान, महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री, एकच दादा, एकच वादा, अजित दादा, अशा आशयाचा मजकूर या होर्डिंगवर लिहिलेला आहे. यामुळे याचे फोटो व्हायरल होत आहेत.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी एका कार्यक्रमात अजित पवारांना पुढील मुख्यमंत्री करण्यासाठी कामाला लागण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले होते. त्यानंतर जयंत पाटील यांचे भावी मुख्यमंत्री अशा आशयाचे पोस्टर्स झळकल्यामुळे राष्ट्रवादीत सध्या मुख्यमंत्री पदासाठी दोन गट पडले असल्याचे दिसून येत आहे.
याबाबत पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना विचारले देखील होते, ते म्हणाले की अजित पवारांना मुख्यमंत्री म्हणून बघायला आवडेल. मात्र सध्या आमच्याकडे त्यासाठीचे संख्याबळ नाही. असे म्हणत त्यांनी या विषयावर बोलणे टाळले होते. काही दिवसांपूर्वी जयंत पाटील यांच्य वाढदिवसानिमित्त त्यांचे काही पोस्टर्स मुंबईत झळकले होते.
दरम्यान, संख्याबळानुसार राष्ट्रवादीकडे मुख्यमंत्रीपद आलं तर मुख्यमंत्री कोण असेल हे शरद पवारच ठरवतील. त्यांचा शब्द आमच्यासाठी अंतिम असेल, असेही जयंत पाटील म्हणाले होते. यामुळे सध्या निवडणुकीची वाट बघावी लागणार आहे.