Amol kolhe : सध्या पुण्यात कसबा आणि पिंपरी चिंचवडमध्ये पोटनिवडणूक सुरू आहे. यामध्ये भाजप, आणि महाविकास आघाडीने नेते जोरदार प्रचार करत आहेत. रोड शो, बैठका, सभा यामुळे पुण्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अनेक नेते याठिकाणी तळ ठोकून आहेत.
असे असताना राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसची मदार ज्यांच्यावर होती, त्यांनी 2019 मध्ये अनेक सभा गाजवल्या, ज्यांच्या सभेमुळे राष्ट्रवादीची अनेक जागा जिंकून येण्यास मदत झाली, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे मात्र कुठे दिसले नाहीत.
लोकसभा गाजविणारे कोल्हे हे या प्रचाराला न आल्याने त्याची मोठी चर्चा सध्या सुरु आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीसाठी ते पक्षाचे स्टार प्रचारक आहेत. तरीही ते प्रचारात सामील झालेले नाहीत. यामुळे ते भाजपमध्ये जाणार का असा प्रश्न निर्माण होत आहे.
असे असताना त्याला कारणही तसेच आहे. त्यांचे जवळचे स्नेही आणि ज्यांचा खासदार होण्यात मोठा वाटा राहिला आहे, अशा स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेचे एक वित्त पुरवठादार राहिलेले महापालिकेतील शिवसेनेचे माजी गटनेते राहूल कलाटे हे बंडखोरी करून अपक्ष म्हणून चिंचवड निवडणुकीत उभे आहेत.
तसेच त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीतील कोल्हेंच्या राष्ट्रवादीचे नाना काटे आहेत. यामुळे आपल्या मैत्रीखातर ते याठिकाणी आले नसल्याचे सांगितले जात आहे. कोल्हे हे चिंचवडच्या प्रचारात सामील झाले असते, तर त्याचा पक्षाच्या उमेदवाराला निश्चीत मोठा फायदा झाला असता.
त्यांचा चाहता वर्ग देखील पुण्यात मोठ्या प्रमाणात आहे. मात्र नाशिकनंतर निपाणीत त्यांच्या महानाट्याचे प्रयोग होणार असून त्याच्या तयारीचे कारण त्यासाठी त्यांनी दिले आहे. यामुळे कोल्हे नेमके याच कारणामुळे आले नाहीत का अजून कोणते कारण आहे, हे येणाऱ्या काळात समजेल.