Uddhav Thackeray : दोन दिवसांपूर्वी राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला धनुष्यबाण चिन्हासह पक्षाचे नाव मिळाले आहे. यामुळे मोठा गोंधळ उडाला आहे. निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
असे असताना शिवसेना आणि धनुष्यबाण गमावल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ॲक्शन मोडवर आले आहेत. रात्री त्यांनी वकिलांची मुंबईत बैठक बोलावली होती. यामुळे मातोश्रीवर खलबत सुरू झाली असून पुढे काय करायचे याची रणनीती ठरवली जात आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालाच्या आणि सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीसंदर्भात चर्चा करण्यासाठी ही बैठक होती, असं सांगण्यात येत आहे. दरम्यान, कायदेतज्ञ उल्हास बापट हे देखील मातोश्रीवर पोहचले होते.
बापट मातोश्रीवर दाखल झाल्यानेही अनेक तर्क वितर्क काढण्यात येत आहेत. सध्या चिन्ह आणि नाव एकनाथ शिंदे यांच्याकडे गेल्याने उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या पुढे काय मार्ग आहेत, यावर देखील चर्चा केली जाणार आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी या निकालानंतर पत्रकार परिषद घेतली होती. यामध्ये त्यांनी केंद्रीय यंत्रणेवर आणि एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला होता. यामुळे शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात रोज जोरदार शाब्दिक चकमक होत आहे.