Ahmednagar Politics : अहमदनगर जिल्ह्यात कोपरगाव-शिर्डीमध्ये एमआयडीसी मंजूर झाली. जवळपास ५०२ एकरात ही एमआयडीसी असेल. ही गोष्ट नगर जिल्ह्यासाठी एक जमेची बाजू ठरणार आहे.
परंतु ही एमआयडीसी मंजूर होताच श्रेयवादावरून राजकीय आरोपांना उधाण आले आहे. काळे कोल्हे यांनी आपण प्रयत्न केल्यामुळे याला यश आले असे आपापल्या पद्धतीने सांगितले. आता माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी यात उडी घेतली आहे. त्यांनी कोल्हे यांच्यावर टीका केली आहे.
* काय म्हणाले माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे
मंजूर झालेली एमआयडीसी म्हणजे भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आहे. परंतु याचे श्रेय विजय वहाडणे यांना मिळू नये म्हणून त्यांनी तीच मागणी तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाईंकडे केली व त्यातून प्रसिध्दी मिळवली.
मीच केले, माझ्यामुळेच झाले असा कांगावा आता त्यांच्याकडून केला जात आहे. परंतु जनतेला सर्व समजते. कागदोपत्री घोडे नाचवून जनतेला मूर्ख बनवणे बंद करा, असा घणाघात वहाडणे यांनी केला. पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
* थेट तारखेवाईज माहिती देत वहाडणे यांचा घणाघात
वहाडणे पत्रकार परिषदेत म्हणाले, २४ ऑक्टोबर २०१८ रोजी हजारो नागरिकांच्या स्वाक्षऱ्या घेऊन मी व भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी मंत्रालयात तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई व महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे संचालक अन्बलगन यांची भेट घेतली होती.
त्यांना एमआयडीसी मंजूर करावी अशी मागणी केली. त्याची दखल घेऊन २६ फेब्रुवारी २०१९ रोजी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ७०० एकर जागा उपलब्ध करावी असे पत्र मला दिले. त्यासाठी तालुक्यात जागेची पहाणी केली. वर्षानुवर्षे आमदारकी भोगलेल्यांना मात्र त्यानंतर जाग आली. त्यांनी एमआयडीसी मंजूर झालीच, तर फक्त विजय वहाडणे यांनाच श्रेय मिळू नये म्हणून त्यांनीही घाईगडबडीत तीच मागणी देसाईकडे केली.
* मंत्री विखे पाटलांचे कौतुक
३० जून २०१३ रोजी राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे मी एमआयडीसीची मागणी केली होती. तेव्हा सकारात्मक प्रतिसाद देऊन राधाकृष्ण विखे पाटील यांनी ५०० एकर क्षेत्रात एमआयडीसी उभारण्याचे जाहीर केले होते.
त्यांनीच खरा शब्द पाळला आहे असे त्यांनी म्हटलं आहे. आ. काळे यांनी देखील मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे कौतुक केले आहे.