राजकारण

तुम्हाला कोणी पालापाचोळा म्हटलं तर काय होईल याचं भान ठेवा; ठाकरेंच्या टीकेला शिंदे गटाचं उत्तर

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीत बंडखोर आमदारांवर जोरदार टीका केली आहे. ‘जी पाने झडताहेत ती सडलेली पाने आहेत, त्यांना झडून जाऊ द्या’, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांवर टीका केली आहे. “वादळ म्हटलं की पालापाचोळा उडतो. सध्या तो पालापाचोळाच उडतोय सध्या. हा पालापाचोळा एकदा खाली बसला की खरं दृश्य लोकांसमोर नक्कीच येणार आहे,” असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. उद्धव ठाकरेंच्या या टीकेला आता शिंदे गटाचे समर्थक आमदार संजय शिरसाट यांनी उत्तर दिले आहे.

आमची हयात शिवसेनेत गेली असून आम्ही पालापोचाळा नाही. उद्धव ठाकरे शिवसेनाप्रमुख होऊ शकत नाही असे ते म्हणाले आहेत. बाळासाहेब तुमची संपत्ती नाहीत, असे शिरसाट यांनी सांगितले आहे.

आमचं काय घेऊन बसला आहात, उद्धव ठाकरेदेखील शिवसेनाप्रमुख होऊ शकत नाहीत. आम्ही शिवसेनाप्रमुखांच्या पायाशी बसून राहू इच्छित आहोत. आम्हाला शिवसेनाप्रमुख होण्याची गरज नाही. आमच्यासाठी शिवसेनाप्रमुख आदरणीय आहेत. त्यांच्याबद्दल आम्ही असं कोणतंही वक्तव्य केलं नव्हतं. आमची लायकी आहे का शिवसेनाप्रमुख होण्याची? आम्ही त्यांच्याशी कधीच बरोबरी केली नाही, असेही संजय शिरसाट म्हणाले आहेत.

“एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर सर्वात प्रथम बाळासाहेबांना वंदन करण्यासाठी गेले होते, ही आमची निष्ठा आहे. एक वेळ तुम्हाला विसरु, पण शिवसेनाप्रमुखांना विसरणार नाही,” असंही ते म्हणाले.

“पालापोचाळा कसं म्हणू शकता? सर्व मोठ्या लोकांच्या सावलीत आम्ही वाढलो. शिवसेनाप्रमुख महाराष्ट्रभर फिरत नव्हते, पण सर्व मोठ्या नेत्यांनी गावांमध्ये, खेड्यात जाऊन शिवसेना रुजवायचे काम केले. त्यांना पालापोचाळा म्हणता येणार नाही. आमच्या आयुष्यातील महत्वाचे दिवस शिवसेनेत घालवले आहेत. माझ्यासारख्या कार्यकर्त्याने शिवसेनेत ३८ वर्ष घालवली आहेत. आजच्या घडीला तुम्हाला आम्ही पालापाचोळा वाटतो? उद्या तुम्हाला कोणी पालापाचोळा म्हटलं तर काय होईल याचं भान ठेवा,” असंही ते म्हणाले आहेत.

“मी मागे एकदा माझ्या मनोगतात म्हटलं होतं की, ज्या वेळी मी ‘वर्षा’त राहात होतो तेव्हाचा अनुभव कथन केला होता. या घराच्या आवारातच दोन झाडं आहेत. एक आहे गुलमोहराचं आणि दुसरं आहे बदामाचं. दोन्ही झाडं मी साधारणतः गेली दोन-एक वर्षे बघतोय. ज्याला आपण पानगळ म्हणतो. त्यात पानं पूर्ण गळून पडतात. फक्त काड्या राहतात. आपल्याला वाटतं, अरे या झाडाला काय झालं? पण दोन ते तीन दिवसांत पुन्हा नवीन कोंब येतात, अंकुर येतात आणि मी बघितलंय, आठ ते दहा दिवसांत ते बदामाचं झाड पुन्हा हिरवंगार झालं. गुलमोहरसुद्धा हिरवागार झाला. म्हणून ही सडलेली पानं असतात ती झडलीच पाहिजेत. जी पाने झडताहेत ती सडलेली पाने आहेत. त्यांना झडून जाऊ द्या,” असे उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांना उद्देशून म्हणाले आहेत.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts