Chhagan Bhujbal : राज्यात पुन्हा एकदा कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे राज्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या विषाणूचा फटका सर्वसामांन्यांपासून बड्या नेत्यांना देखील बसला आहे. त्यातच आता राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.
भुजबळ हे येवला येथे शहीद जवान अजित शेळके यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी गेले होते. जवान शेळके यांच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर ते येवला येथील निवासस्थानी गेल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. त्यानंतर ते येवल्याहून नाशिकमध्ये परतले. थंडी, ताप असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर तपासणी केली असता कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले आहेत.
यामुळे आता कोरोना पुन्हा डोकं वर काढत असल्याचे दिसून येत आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती छगन भुजबळ यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे. पुढचे काही दिवस घरीच विश्रांती घेणार असल्याचे समजते आहे.
संध्याकाळी छगन भुजबळ यांची प्रकृती अचानक बिघडली. लागलीच त्यांना नाशिक येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. यात ते कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. सध्या त्यांच्यावर भुजबळ फार्म येथील राहत्या घरीच उपचार सुरू आहेत.
दरम्यान, राज्यात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. रुग्णवाढीचा दर सुमारे तीन टक्के इतका आहे. एच१एन१, एच३एन२ आणि इन्फ्लूएन्झा रुग्णांची संख्या वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर, आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. यामुळे काळजी घ्यावी लागणार आहे.