CM Eknath Shinde News : येत्या काही दिवसांनी महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. दरम्यान या निवडणुकांच्या आधीच शिवसेना शिंदे गटाचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जीवन प्रवास मांडणार नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येणार असे दिसत आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, शिवसेनेचे दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांचा जीवन प्रवास मांडणाऱ्या धर्मवीर आणि धर्मवीर 2 या चित्रपटांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची व्यक्तिरेखा पाहायला मिळाली आहे.
या दोन्ही चित्रपटांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजकीय आयुष्यातील काही महत्त्वपूर्ण भाग दाखवला गेला होता. खरे तर दिवंगत आनंद दिघे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राजकीय गुरू होते. या गुरु शिष्याचे नाते कसे होते हे धर्मवीर चित्रपटातुन जगासमोर मांडण्यात आले आहे.
विशेष म्हणजे या चित्रपटानंतर शिंदे यांच्या जीवनावर आधारित चरित्र ग्रंथ देखील प्रकाशित झाला आहे. गेल्या महिन्यात हा चरित्र ग्रंथ प्रकाशित करण्यात आला असून या चरित्र ग्रंथाचे लेखन डॉक्टर प्रदीप ढवळ यांनी केले आहे. या चरित्र ग्रंथाचे विमोचन राज्यपालांच्या हस्ते झाले आहे.
दरम्यान आता चरित्र ग्रंथानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जीवनावर आधारित एकपात्री नाटक देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हे एकपात्री नाटक चरित्र ग्रंथाचे लेखन ज्यांनी केले आहे ते लेखक डॉक्टर प्रदीप ढवळ यांच्या माध्यमातून तयार करण्यात आले आहे.
या नाटकाला मला काही सांगायचंय असं नाव देण्यात आला आहे. या नाटकात मुख्य भूमिका संग्राम समेळ यांची राहणार आहे. हे नाटक रंगभूमीवर येण्याआधी सेन्सर बोर्डाकडून परवानगी घ्यावी लागणार आहे. यानुसार हे नाटक मंजुरीसाठी सेन्सर बोर्डाकडे पाठवण्यात आले आहे.
दरम्यान आता हे नाटक रंगभूमीवर कधी येणार याची साऱ्यांनाच उत्सुकता लागली आहे. या नाटकातून मुख्यमंत्री शिंदेंना नेमकं काय सांगायचंय? याची तर सगळ्यांनाच उत्सुकता आहे. राजकीय विश्लेषक देखील या नाटकाकडे विशेष लक्ष ठेवून आहेत.
या नाटकात नेमकं काय असेल हे अजून समोर आलेले नाही. पण, त्यांनी शिवसेनेत बंड का केलं, उद्धव ठाकरेंची साथ का सोडली, त्यावेळी शिंदेंची मानसिकता काय होती? या सगळ्या गोष्टी नाटकातून पाहायला मिळू शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे.