मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (एमएससीबी) कथित घोटाळ्यातील बारामती अॅग्रो कंपनीशी संबंधित मनी लाँडरिंग प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची बुधवारी सुमारे ११ तास कसून चौकशी केली. आमदार रोहित पवार यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ईडी कार्यालय परिसरात मोठी गर्दी केल्याने पोलिसांनी येथे कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे ईडी कार्यालयाला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.
अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांच्याशी संबंधित बारमती अॅग्रो आणि अन्य कंपन्यांनी कथित एमएससी बँक घोटाळ्यात संशयास्पद व्यवहार करून तोट्यात गेलेले साखर कारखाने लिलावाद्वारे विकत घेतल्याचा आरोप आहे. यात कन्नड एसएसके मिल ही बारामती अॅग्रो प्रा. लि. कंपनीला ५० कोटींना विकली गेली होती.
बारामती अॅग्रोने कन्नड एसएसके खरेदी करण्यासाठी लागलेला पैसा वेगवेगळ्या बँकांमधील खात्यांमधून खेळत्या भांडवल सुविधेतून घेतल्याचा आरोप आहे. बारामती अॅग्रो, हायटेक इंजिनीअरिंग कॉर्पोरशन इंडिया लि. आणि समृद्धी शुगर प्रा. लि. यांनी कन्नड एसएसके खरेदी करण्यासाठी लिलावात भाग घेतला. हायटेक इंजिनीअरिंगने बयाणा ठेव म्हणून दिलेले पाच कोटी बारामती अॅग्रोकडून घेतल्याच्या आरोपाची ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे.
आमदार रोहित पवार यांच्या बारमती अॅग्रोशी संबंधित कथित गैरव्यवहाराप्रकरणी ईडीने गेल्या वर्षी आमदार रोहित पवार यांना नोटीस पाठवली होती. त्यानंतर राजकीय उलथापालथ झाल्याने हे प्रकरण थंड पडले होते. त्यानंतर ईडीने या कंपनीसह अन्य पाच कंपन्या, संबंधित व्यक्ती यांच्या मुंबई, पुणे, बारामती येथील सहा ठिकाणी ५ जानेवारीला छापेमारी केली.
ईडीने आमदार रोहित पवार यांना समन्स बजावून २४ जानेवारीला ईडीच्या मुंबईतील कार्यालयात चौकशीला हजर राहण्यास सांगितले. त्यानुसार आमदार रोहित पवार हे बुधवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास ईडीच्या बॅलार्ड पियर येथील कार्यालयात पोहोचले.
आमदार रोहित पवार यांच्यासोबत खासदार सुप्रिया सुळे ईडी कार्यालयात गेल्या होत्या, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे ईडी कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयात बसले होते. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते जमले होते. त्याआधीच पोलिसांनी ईडी कार्यालयाबाहेर बॅरिकेड्स उभे करून तगडा बंदोबस्त ठेवला होता.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सकाळी आणि दुपारी ही बॅरिकेड्स ओलांडून ईडी कार्यालयासमोर जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांना अडवले. त्यामुळे येथे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. रात्री दहाच्या सुमारास रोहित पवार ईडी कार्यालयातून बाहेर पडले.
मी लढणारा कार्यकर्ता – रोहित
मी कोणतेही चुकीचे काम केलेले नाही, त्यामुळे कोणत्याही चौकशीसाठी मला घाबरण्याचे कारण नाही. मी शरद पवारांच्या विचारांवर चालणारा कार्यकर्ता आहे. मी पळणारा नव्हे, तर लढणारा आहे. जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत संघर्ष करत राहणार, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी बुधवारी ईडी कार्यालयात चौकशीला जाण्यापूर्वी प्रसारमाध्यमांना दिली.
रोहित पवार पुढे म्हणाले, बलाढ्य शक्तीच्या विरोधात सर्वसामान्य जनतेचे, विद्यार्थ्यांचे, शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन आवाज उठवल्याने आपल्याविरोधात चौकशी करण्यात येत असल्याचे चित्र आहे. मी या चौकशीदरम्यान ईडीच्या अधिकाऱ्यांना संपूर्ण सहकार्य करणार आहे. अधिकारी हे त्यांचे काम करत असतात.
यापूर्वीदेखील मी त्यांना सहकार्य केलेले आहे. यापूर्वी सीआयडीने मागितलेली कागदपत्रे आता ईडीने चौकशीसाठी मागितली आहेत. त्यामुळे ईडीचे अधिकारी जी माहिती मागतील ती त्यांना देऊन सहकार्य करू. ही चौकशी झाल्यानंतर शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा एकदा जोमाने काम करत राहणार असल्याचे पवार यांनी सांगितले.