Ahmednagar News : मी सत्तेला हापापलेला कार्यकर्ता नसून मला उपमुख्यमंत्री म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच अमित शहा यांच्यामुळे संधी मिळाली असून या संधीचे सोने करणार आहे. नगर जिल्हा हा संवेदनशील जिल्हा असून या जिल्ह्याने सहकार क्षेत्राच्या माध्यमातून अनेक दिग्गज नेते दिले आहेत.
यात स्व.शिवाजीराव नागवडे यांचे देखील नाव अग्रक्रमाने येत असल्याचे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. श्रीगोंदा येथे स्व.शिवाजीराव नागवडे यांच्या जयंती निमित्त ते बोलत होते. पुढे ते म्हणाले की, राज्यात १४ हजार कोटीची कामे झाली.
शेतीसाठी कुकडीच्या पाण्याचे नियोजन करण्यासाठी महायुतीचे सर्व प्रतिनिधी प्रयत्न करत आहेत. यासाठी कालवे दुरुस्ती, बंद पाईप मधून पाणी वहन यासारख्या उपाययोजना करत शेतीसाठी ठिबक सिंचनासाठी प्रोत्साहन देत असल्याचे सांगितले.
तोडणी वाहतुकीमुळे सहकारी कारखाने अडचणीत आले असल्याने कारखान्यांनी टप्प्या टप्प्याने आधुनिकीकरणाचा अवलंब करत हार्वेस्टिंग मशीन हा एकमेव पर्याय आहे. त्यामुळे आगामी काळात हार्वेस्टिंग मशीनसाठी अनुदान देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ना.अजित पवार यांनी सांगितले.
नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे म्हणाले, स्व. बापूंनी सहकाऱ्यांच्या मदतीने तालुक्यात सहकारासह शिक्षणाचे मोठे जाळे उभारले आहे. कुकडी आणि घोडच्या पाण्यासाठी मोठा लढा उभा करत श्रीगोंदा तालुक्याला दिशा देण्याचे काम केले.
सहकारासह शिक्षणात तालुक्याच्या पाठीशी स्व.बापू खंबीर उभे राहिले असल्याचे सांगत २०१९ साली विधानसभा निवडणुक लढविण्याची अपेक्षा होती, मात्र काही कारणास्तव माघार घ्यावी लागली होती. मात्र २०२४ मध्ये अनुराधा नागवडे विधानसभा लढविणार असल्याचा ठाम निर्णय घेतला असून ना.अजित पवार यांना पाठीशी हात राहू देण्याची विनंती केली.
यावेळी आ.बबनराव पाचपुते यांनी बोलताना स्व.बापूंनी तालुक्याच्या विकासासाठी मोठे योगदान दिले असून राजकारण करत असताना आमच्यात मतभेद होत होते. मात्र मनभेद कधीही झाले नसल्याचे सांगत ना.अजित पवार यांना राजकारणात काम करत असताना खूप त्रास सहन करावा लागला होता.
त्याचा साक्षीदार असल्याची आठवण सांगत त्यांना दोनदा संधी आली आणि गेली मात्र आता पुन्हा संधी मिळाली असून, ते कधीही कामाबाबत मागे पुढे पाहत नसल्याचे सांगतले. तसेच कोरोनामधून सुटलो असून पुन्हा एकदा नव्याने उभारी घेणार असल्याचे यावेळी सांगितले