मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठा निर्णय घेतला आहे. शरद पवारांनी पक्षाचे राष्ट्रीय पातळीवरील सर्व विभाग आणि सेल बरखास्त केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिव प्रफुल्ल पटेल यांनी संबंधित प्रमुखांना पत्र पाठवले असून ते पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. यासोबत त्यांनी ट्विट करत अधिकृतपणे निर्णयाची माहिती दिली आहे.
अध्यक्ष शरद पवारांच्या संमतीने पक्षाचे राष्ट्रीय पातळीवरील सर्व विभाग आणि सेल तात्काळ बरखास्त करण्यात येत आहेत. यामधून राष्ट्रवादी महिला काँग्रेस, राष्ट्रवादी युथ काँग्रेस आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसला वगळण्यात आले आहे, अशी माहिती प्रफुल्ल पटेल यांनी ट्वीट करत दिली आहे.
शरद पवारांनी हा निर्णय महाराष्ट्र आणि इतर कोणत्याही राज्यातील पक्ष संघटनेला लागू होणार नसल्याचेही स्पष्ट केले आहे. प्रफुल्ल पटेल यांनी ट्वीटमध्ये कुठेही या निर्णयामागील कारणाचा उल्लेख केलेला नाही. राज्यात महाविकास आघाडी सरकार कोसळल्याच्या तीन आठवड्यांनंतर शरद पवारांनी घेतलेल्या या निर्णयामुळे अनेकजण आश्चर्य व्यक्त करत आहेत.