राजकारण

Ahmednagar Politics : तीन महिन्यांत खासदारकीची स्वप्न बघू नका ! खासदार सुजय विखे स्पष्टच बोलले

Ahmednagar Politics : जे विरोधात बोलतात त्यांची दया येते. आरोप प्रत्यारोप आपणसुद्धा करू शकतो. चार दोन जणांच्या गाठीभेटीने जिल्ह्याचा खासदार ठरत नाही. केवळ इच्छा असून, चालत नाही, त्यासाठी लोकांची कामे करावी लागतात.

कुरघोड्या नाही, फोडाफोडीचे राजकारण अवघड नाही. आज विरोधात बोलणारे उद्या गाडीत बसलेली दिसतात. कोण कधी काय करील, याचा नेम नाही. पदासाठी उतावीळ होऊ नका. तीन महिन्यांत खासदारकीची स्वप्न बघू नका, अशा शब्दांत खासदार डॉ. सुजय विखे यांनी नामोल्लेख टाळत आमदार निलेश लंके यांच्यावर निषाणा साधला.

बाजारतळावर प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत ३३४ लाभार्थ्यांना घरकुल अनुदान धनादेश वाटपाचा कार्यक्रम पार पडला, या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार मोनिका राजळे तर प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर,

अजय भंडारी, ज्येष्ठ नेते अशोक चोरमले, राहुल राजळे, माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, नंदकुमार शेळके, अॅड. प्रतीक खेडकर, अजय रक्ताटेंसह भाजपचे कार्यकर्ते, माजी पदाधिकारी, मुख्याधिकारी संतोष लांडगे, प्रकल्प अधिकारी अनिल कोळगे, लक्ष्मण हाडके उपस्थित होते.

या वेळी बोलताना विखे म्हणाले, जी कामे आम्ही केली नाहीत, त्याचे श्रेय कधी घेत नाही. राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचा पाठपुरावा करून पूर्ण केला नसता तर १६ कोटी रुपये कसे आणले, याचा विचार टीकाकारांनी करावा.

पालकमंत्री राधाकृष्ण विखे व आमदारांच्या प्रयत्नांतून ऊसतोडणी कामगारांच्या मुला-मुलींच्या वस्तीगृहासाठी २५ एकर जमीन मिळवली आहे. गेली पाच वर्षे कसलाही आरोप न होता आपण काम केले.

पक्षाने संधी दिली तर पुन्हा एकदा आपण निवडणूक लढविण्यास तयार आहोत, कणी काहीही बोलत असले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कारकीर्द उत्तुंग असल्याने त्यांच्या नेतृत्वाखाली देशात पुन्हा भाजपचे सरकार येईल. ज्यांची यंत्रणा मध्यरात्रीनंतर कार्यान्वित होते, अशा लोकांपासून सावध रहा.

शहरासह मतदार संघाच्या विकासासाठी संपूर्ण विखे कुटुंब आमदारांच्या पाठीशी पूर्ण ताकतीने उभे आहे. तिकडची माणसे एवढे फिरतात, इकडे तिकडे येतात, एक तरी काम केले का? समाजाला यांचा काय उपयोग?

तुम्ही खंबीरपणे पाठीशी उभे रहा, अशा लोकांचा बंदोबस्त फक्त सुजय विखेच करू शकतो. अशा प्रवृत्तींचा सामना करण्यासाठी मी पुन्हा येईन, असे विखे म्हणाले. प्रास्ताविक मृत्युंजय गर्जे, स्वागत संतोष लांडगे, सूत्रसंचालन राजीव सरवसे यांनी केले.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts