Eknath Shinde : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या पक्षाच्या सर्व आमदार-खासदारांना घेऊन अयोध्येत जाणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. त्यानंतर आता त्यांच्या अयोध्या दौऱ्याची तारीख समोर आली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एकनाथ शिंदे येत्या 6 एप्रिलला अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.
मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे आमदार-खासदार अयोध्येत जावून रामलल्लाचे दर्शन घेणार आहेत. अयोध्येतील महंतांनी निमंत्रण दिलेलं आहे. त्या आमंत्रणाचा मान ठेवून आपण जाणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: म्हणाले आहेत.
आता एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यादरम्यान नेमक्या काय-काय घडामोडी घडतात ते पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, आमदारांनी गुवाहाटी येथील प्रसिद्ध असलेल्या कामाख्या देवीच्या मंदिराला भेट दिलेली. सर्व आमदारांनी कामाख्या देवीचे दर्शन घेतले होते.
तसेच नवं सरकार स्थापन झाल्यास आपण पुन्हा दर्शनासाठी येऊ, असा नवस त्यांनी केलेला. दरम्यान, अयोध्या हे आमच्या श्रद्धेचा आणि अस्मितेचा विषय आहे. त्यामुळे आम्ही नक्कीच अयोध्येला जाऊ, असे मुख्यमंत्री म्हणाले होते.
शिवसेनेचे नेते नरेश म्हस्के, भाऊ चौधरी, सुशांत शेलार अयोध्येत गेले होते. या तीनही नेत्यांकडून संध्याकाळी शरयू नदीवर आरती करण्यात आलेली. सध्या या दौऱ्याची तयारी सुरू असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.