Girish Bapat : काही वेळापूर्वी पुण्यात खासदार गिरीश बापट यांचे निधन झाले. यामुळे दुःख व्यक्त केले जात आहे. गिरीश बापट हे राजकारणापलीकडे संबंध ठेवून होते. सर्व पक्षांत त्यांचे चांगले संबंध होते. त्यांच्या निधनाची बातमी कळताच आठवणीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अंकुश काकडे अत्यंत भावूक झाले होते.
ते म्हणाले सख्खा भाऊ जेवढं प्रेम करणार नाही तेवढ गिरीश यांनी माझ्यावर प्रेम केले. आजकालचे नेते एका पक्षातून दुसऱ्या पक्षात गेले की त्यांच्याकडे संशयित नजरेने पाहिले जात. पण गिरीश बापटांनी कधीही त्यांच्या पक्षाशी गद्दारी केली नाही. ते शेवटपर्यंत आपल्या पक्षाशी प्रामाणिक राहिले. सर्वांशी त्यांचे मैत्रीचे संबंध होते.
कसब्याच्या निवडणुकीत त्यांना उभे राहण्यासाठी शुभेच्छा दिल्या. पण त्यांना कधी मत देऊ शकलो नाही ही वस्तुस्थिती आहे. राजकारणातही मैत्री कशी करावी हे गिरीश बापटांकडून शिकावे, आजच्या राजकारणात बापट यांच्यासारखी मैत्री आपण ठेवावी, असा सल्ला मी आजच्या तरुण नेत्यांना, कार्यकर्त्यांना देईल, असेही ते म्हणाले.
दरम्यान, गिरीश बापट यांचे प्रदीर्घ आजारामुळे निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, सून असा परिवार आहे. पुण्याच्या राजकारणात ‘भाऊ’ म्हणून ओळखले जाणारे गिरीश बापट यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु होते.
ते अनेक वर्षे सक्रिय राजकारणात होते. अनेक पदे त्यांनी भूषवली होती. भाजपच्या जुन्या फळीतील नेत्यांपैकी एक म्हणून बापट ओळखले जातात. पुण्यात भाजप वाढवण्यात गिरीश बापट यांचे महत्त्वाचे योगदान आहे. तसेच त्यांनी सर्व पक्षातील नेत्यांशी चांगले संबंध ठेवले होते.
काही दिवसापूर्वी बापट यांच्या तब्येतीत सुधारणा झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता. मात्र ऑक्सिजनची श्वसन नलिका त्यांना लावलेली होती. अशा परिस्थितही बापट यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी कसबा कार्यालय गाठले होते.