Hasan Mushrif : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफांवर कथित गैरव्यवहाराचे आरोप केले आहेत. यामुळे सध्या मुश्रीक यांची चौकशी सुरू आहे. आता मुश्रीफ यांच्या तीन मुलांनी मुंबई सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी धाव घेतली आहे
हसन मुश्रीफ यांच्या नाविद, आबिद आणि साजिद मुश्रीफ यांनी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात अर्ज दाखल केला आहे. यामुळे त्यांना अटक होणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
अर्जातून राजकीय हेतूने अटकेच्या धमक्यांचा वापर केला जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. ईडीकडून मुश्रीफ यांच्यावर 35 कोटी रुपयांच्या कथित मनी लाँड्रिंग प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. यामुळे ते अडचणीत आले आहेत.
दरम्यान, मुश्रीफ यांच्या कन्येच्या कोल्हापुरातील सासने मैदान परिसरातील घरावरही छापा टाकण्यात आला. 11 जानेवारी रोजीच ईडीकडून पुण्यातही मुश्रीफ यांच्याशी संबंधित चार ठिकाणी छापे टाकले होते.
तसेच माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांचे निवासस्थान, सरसेनापती संताजी घोरपडे कारखाना या ठिकाणी 11 जानेवारी रोजी ईडीने छापेमारी केली होती. हसन मुश्रीफ अध्यक्ष असलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मुख्य कार्यालय, कागल तालुक्यातील सेनापती कापशी येथील जिल्हा बँकेची शाखा येथे छापमारी करण्यात आली होती.
दरम्यान, सर सेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याशी संबंधित व्यवहारांबाबत ईडीने चौकशी सुरू केली आहे. या बँकेच्या कामकाजात मुश्रीफ यांच्या मुलांचा संबंध आहे, असा दावा ईडीने केला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी वारंवार हसन मुश्रीफ यांच्यावर जाहीर आरोप केले आहेत.