Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कालच्या सभेत ठाकरे गटावर जोरदार टीका केली. आपल्या वाट्याला गेल्यामुळे उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रीपद गेल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले आहे. मशिदीवरील भोंग्यांच्या प्रकरणात मनसे कार्यकर्त्यांवर केसेस दाखल केल्या आणि नंतर उद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्रीपद गेले, असेही ते म्हणाले.
असे असताना आता त्यावर संजय राऊतांनी राज ठाकरेंना लक्ष्य केले आहे. राऊत म्हणाले, कुणी कुणाच्या वाट्याला गेलेले नाही. त्यांच्या वाट्याला जाण्याइतका त्यांचा पक्ष मोठा नाही, असा टोला राऊत यांनी राज ठाकरे यांना लगावला आहे.
महाराष्ट्रात शिवसेनेचे सरकार किंवा मुख्यमंत्रीपद का गेलं हे आख्ख्या जगाला माहिती आहे. त्यांना जर माहिती नसेल तर अजून त्यांच्या पक्षाची वाढ व्यवस्थित होणं गरजेचे असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. यावरून आता ठाकरे गट आणि मनसेमध्ये जुंपण्याची शक्यता आहे.
तसेच राऊत म्हणाले, महाराष्ट्रातले सरकार हे फक्त ईडी, सीबीआय या यंत्रणांचा गैरवापर करून पाडण्यात आले आहे. आणि जोडीला खोके, ईडी काय आहे हे काही मी मनसे प्रमुखांना वेगळं सांगायला नको.
त्यांनी त्याचा चांगला अनुभव घेतला आहे. फक्त इडीचा अनुभव आम्ही घेऊनही आमच्या तोफा आणि कार्य चालू आहे, असेही संजय राऊत म्हणाले आहेत. यामुळे संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना चांगलेच खडसावले आहे.