Maharashtra Politics : भाजपच्या सोबतीने या वेळी युती सरकार स्थापन केल्यानंतर पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारावेळी शिवसेनेच्या कोट्यातील पहिल्या ९ मंत्र्यांमध्ये कोण शपथ घेणार, यासाठी फुटलेल्या आमदारांमध्ये चढाओढ लागली होती.
या वेळी एकाने माझी बायको आत्महत्या करेल, तर दुसऱ्याने नारायण राणे मला संपवतील असे सांगून मंत्रीपदे घेतली.
आम्ही मात्र थांबलो ते अजूनपर्यंत थांबलोच, असा गजब किस्सा महाडचे शिवसेना आमदार भरत गोगावले यांनी एका जाहीर कार्यक्रमात एकदम विनोदी शैलीत सांगितला. मंत्रीपदासाठी आग्रही असलेल्या गोगावले यांच्या या किस्स्यांची आता राज्यभर खुमासदार चर्चा सुरू आहे.
राज्यात शिंदे सरकार स्थापन होऊन वर्षांचा कालावधी उलटला. अशातच राष्ट्रवादीतील अजित पवार गट या सरकारमध्ये सामील झाला आणि सत्तेचा वाटेकरी बनला. मंत्रीपदासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या आमदारांच्या पदरी निराशाच आली.
भरत गोगावले यांच्याबाबत याची जास्तच चर्चा झाली. अशात आता अलिबाग तालुक्यातील खानाव येथे काँग्रेसच्या अनंत गोंधळी यांच्या शिवसेना प्रवेशावेळी गोगावले यांनी आमदारांनी मंत्रीपदासाठी काय काय कारणे पुढे केली, याचा धम्माल किस्सा सांगितला.
मुख्यमंत्री शिंदेंच्या प्रेमापोटी आपण मंत्रीपदाचा त्याग केल्याचेही त्यांनी सांगितले. मंत्रीपदाचे किस्से सांगताना ते म्हणाले, सत्ता स्थापनेवेळी प्रत्येकाला मंत्री व्हायचे होते. काही आमदारांनी तर थेट शिंदे यांना धमकीच दिली. आम्हाला मंत्रीपद मिळाले नाही तर आम्ही शपथविधी झाल्या झाल्या बाहेर पडणार, असे ते बोलू लागले.
एकाने मंत्री न झाल्यास माझी पत्नी आत्महत्या करेल, असे सांगितले. दुसऱ्याने सांगितले, नारायण राणे मला संपवून टाकतील. त्या दोघांना मंत्रीपद मिळाले. तिसरा म्हणाला, मला मंत्रीपद मिळाले नाही तर मी राजीनामा देतो, मी एकाला फोन केला अरे तुमच्या संभाजीनगरमध्ये पाचपैकी दोघांना मंत्रिपदे दिली आहेत. तुला काय घाई आहे, असे सांगून त्याला थांबवले.
आम्ही थांबलो ते अजूनपर्यंत थांबलो. मंत्रिमंडळ विस्तारात माझाच नंबर होता; परंतु ज्या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अडचणीत आले होते. त्या वेळी मी माघार घेतली. तेव्हा सगळ्या आमदारांनी आमचं कौतुक केलं, आता मला बडबडत आहेत. आजकाल पंचायत समितीचा सदस्यदेखील सोडत नाही; परंतु सरकार अडचणीत येऊ नये म्हणूनच मी थांबलो, असेही गोगावले म्हणाले.