मुंबई : गुरुपौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्यातील आनंद आश्रम येथे आले होते. यावेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी उद्धव ठाकरेंना खोचक टोला लगावला आहे.
शिवसेनेच्या सर्व खासदारांची हीच भूमिका होती की, राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पांठीबा देणे. आम्ही देखील त्यांना आधीच पाठींबा दिलेला आहे. एका आदिवासी समाजाला मुख्यप्रवाहात आणण्याचे काम पंतप्रधान मोदी यांनी केले आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
उध्दव ठाकरे यांनी जी आता भूमिका घेतली आहे, हीच भूमिका अडीच वर्षापूर्वीच घेतली असती तर आज आमच्यावर ही वेळ आली नसती, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना लगावला आहे.
सध्या राज्यात जे सरकार आहे, ते स्थिर सरकार असून ते योग्य आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे पक्ष अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेनेसोबत युती करण्यासंदर्भातील जो प्रस्ताव दिला आहे तो योग्य नाही, असे एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केले आहे.
आम्हाला आता कोणत्याही प्रकारचे राजकारण करायचे नसून राज्याचा सर्वांगीण विकास हेच आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे. तर मनसे प्रमुख राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची झालेली भेट ही सदीच्छा भेट असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.