हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजलेय. लवकरच तेथे निवडणुका पार पडतील. त्यानंतर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका पार पडतील. साधारण नोव्हेंबर मध्ये या निवडणुका पार पडतील.
त्यामुळे राजकीय पक्षांना तयारीसाठी आणखी जास्त कालावधी मिळालाय. महायुती सरकार विविध योजनांच्या मध्यमातून नागरिकांना आपल्याकडे ओढवण्याचा प्रयत्न करतंय. तर महाविकास आघाडीही प्रयत्नशील आहे.
महाराष्ट्रात विधानसभा झाल्यास कुणाची सत्ता येईल याबाबत मॅट्रीस सर्व्हे एजन्सीने आणि टाइम्स नाऊने मतदारांचा ओपिनियन पोल जाहीर केलाय. यामध्ये महाराष्ट्र, झारखंड आणि हरियाणा या तीनही राज्यांचा समावेश होता.
महाराष्ट्रात कशी असेल स्थिती?
सर्वेक्षणानुसार महाराष्ट्रात जर लगेचच निवडणुका झाल्या तर त्यांच्या सर्व्हेनुसार भाजपला 95 ते 105 जागा मिळतील असं म्हटलंय. शिवसेनेला (शिंदे गट) 19 ते 24 जागा व अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला 7 ते 12 जागा भेटतील असा अंदाज व्यक्त करतण्यात आलाय.
काँग्रेसचा विचार केला तर त्यांना 42 ते 47 जागा, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) 26 ते 31 जागा व शरद पवार गटास 23 ते 28 जागा मिळतील असे या सर्व्हेत म्हटले गेले आहे. इतर पक्ष आणि उमेदवार 11 ते 16 जागा जिंकतील असे यात वर्तवले आहे.
कशी असेल मतांची टक्केवारी?
मतांची टक्केवारी जर या अंदाजानुसार पाहिली तर भाजपला 25.8 टक्के, शिवसेनेला 14.2 टक्के, अजित पवार गटास 5.2 टक्के मते मिळतील. काँग्रेसला 18.6 टक्के, शिवसेना ठाकरे गटाला 17.6, शरद पवार गटास 6.2 टक्के मते पडतील असे म्हटले जात आहे.
हरियाणात काय?
या सर्व्हेनुसार भाजप आघाडीला 37 ते 42 जागा, काँग्रेसला 33 ते 38 जागा, जेजेपीला 3 ते 8 व इतर पक्षांना 7 ते 12 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.