Maharashtra News : जर काही लोकांना वाटत असेल की, शरद पवार यांना बडव्यांनी घेरले, तर मी येवल्याला जाऊन शरद पवार यांना सांगून माझे राजकारण थांबवतो. पक्ष सोडून गेलेल्या त्या सर्वांनी परत यावे, असे भावनिक आवाहन आमदार जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना केले.
केवळ मीच नव्हे तर जयंत पाटील यांच्याशीही बोलतो. तेही बाजूला होतील. ते जर परत येणार असतील तर आम्ही खरंच बाजूला व्हायला तयार आहोत, असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले. शनिवारी येवला दौऱ्यावर निघालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांचे राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हाध्यक्ष सुहास देसाई यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी ढोल-ताशे आणि फटाक्यांच्या आतषबाजीत जोरदार स्वागत केले.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार यांचा हा पहिलाच नाशिक दौरा आहे. या दौऱ्यामध्ये पवार यांच्यासोबत राष्ट्रीय कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, खा. अमोल कोल्हे हे सहभागी झाले आहेत. शनिवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास शरद पवार यांचे आनंद नगर चेकनाका येथे आगमन झाले.
यावेळी कार्यकत्यांनी ‘आम्ही सारे साहेबांसोबत’, ‘देशाचा बुलंद आवाज शरद पवार’, ‘देश का नेता कैसा हो, शरद पवार जैसा हो’ अशी घोषणाबाजी केली. कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केल्यानंतर पवार यांनी नाशिकच्या दिशेने कूच केले. यावेळी ठाण्यातील कार्यकर्तेही आपापल्या गाड्यांमधून दौऱ्यामध्ये सहभागी झाले.
यावेळी ठामपाचे माजी विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील, शानू पठाण, राष्ट्रवादीचे ठाणे कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, महिला कार्याध्यक्षा सुरेखा पाटील, युवक अध्यक्ष विक्रम खामकर, युवती अध्यक्षा पल्लवी जगताप, विद्यार्थी अध्यक्ष प्रफुल्ल कांबळे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.